दिनांक ५ एप्रिल,श्रीगोंदा:
तालुका आरपीआय आठवले गटाच्या माध्यमांतून श्रीगोंद्यात चालू असलेल्या हायवेच्या कामाला विरोध करीत कार्यकर्त्यांनी या रस्त्याच्या कामासाठी मुरूम वाहणाऱ्या पाच हायवा गाड्या अडवून त्यांच्या काचांची तोडफोड केली आहे. श्रीगोंदा शहरातून चाललेल्या हायवेच्या कामासाठी सदर ठेकेदाराने राजस्थान आणि परप्रांतीय संसाधन, यंत्रणा व मनुष्यबळ लावले असून, कोरोना साथीमुळे कार्यक्षेत्रातील तरुण बेरोजगार झालेले असतांना अशा पद्धतीने स्थानिकांना उपेक्षित ठेवत, पर राज्यातील यंत्रणा वापरण्याऐवजी स्थानिकांना संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने सदर आंदोलन करण्यात आले. या विषयीचे निवेदन स्थानिक प्रशासनास सादर करण्यात आले होते.

सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ते बीड दरम्यान चालू असलेल्या हायवे रस्त्याचा ठेका राजस्थान येथील एका कंपनीने घेतला आहे. या कंपनीमार्फत चालू कामासाठी ते राजस्थान किंवा परप्रांतीय मनुष्यबळ सह यंत्रणा वापरत आहेत. कोरोना महामारीमध्ये तालुक्यातील तरुण अक्षरशः बेरोजगार झाले असून, त्यांच्या हाताला काम नाही. तालुक्यातून चाललेल्या हायवे कामासाठी तालुक्यातील बेरोजगार तरुणांना कामावर घ्यावे. यासाठी आंदोलनाचे निवेदन देण्यात आले होते. दोन दिवसात कोणतीही कारवाई व प्रतिसाद न मिळाल्यामुळे आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान श्रीगोंदा ते रेल्वे स्टेशन रोड वरील चाललेल्या कंपनीच्या गाड्या अडवून तोडफोड केली आहे.(Intense agitation of RPI (A) for unemployed in the taluka … Activists in police custody ..)
या केलेल्या तोडफोड मध्ये नमूद ठेकेदाराच्या गाड्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाने तात्काळ कारवाई करीत शहराध्यक्ष विशाल घोडके व अविनाश घोडके या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. दोन दिवसांपूर्वी देण्यात आलेल्या निवेदनाच्या माध्यमातून स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलक व नमूद ठेकेदार यांच्यामध्ये बैठक करीत आंदोलनातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदरील बैठकीला आंदोलकांनी उपस्थित राहण्यास तयार नसल्याचे मत स्थानिक प्रशासनाने व्यक्त केले असून, आम्हाला बैठकीसाठी बोललेच नाही. असे आंदोलकांचे म्हणणे आहे. याबाबत अपेक्षित कारवाई न झाल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा Rpi पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
स्रोत:(घडलेली घटना)
