माझा जन्म अन् माय – मावशीचे कष्ट
वडिलांना जाऊन आठवडा लोटला. छोटी द्रौपदी व चिमुकल्या दीपकला मावशी आपल्या घरी घेऊन गेली. आई मात्र अजुनही त्या भकास झोपडीत एकटीच अश्रू ढाळत बसलेली असायची. वडिलांचं ‘दहावं’ करायचं आहे व त्यासाठी घरात एक दमडीही शिल्लक नाही, याचं तिला भान नव्हतं. वडिलांच्या नातेवाईकांनी दहाव्यासाठी घरची गाभण असलेली म्हैस, जी काही दिवसांतच दुभती होणार होती, ती जुन्या गावातल्या शेतकऱ्याला केवळ ८०० रूपयांना विकून टाकली व त्या पैशांतून दहावं उरकलं. जेव्हा ही गोष्ट मावशीला कळली, तेव्हा ती खूपच चिडली. ती थेट त्या शेतकऱ्याकडे गेली व म्हैस परत मागू लागली. तो शेतकरी मात्र काही दिवसांपूर्वीच ८०० रूपयांना घेतलेल्या आमच्याच म्हशीसाठी आता १००० रूपये मागू लागला. शेवटी मावशीनेच स्वत : जवळचे काही व काही पैसे उधार घेऊन म्हैस घरी परत आणली.

याचवेळी वडिलांकडच्या लोकांनी आईवर आणखी एक जबरदस्त आघात केला. आता गर्भपात करून घेण्यासाठी ते सर्व आईवर प्रचंड दबाव आणत होते. त्यावेळी मी आईच्या गर्भात तीन महिन्यांचा असेन, पण पुन्हा एकदा मावशी खंबीरपणे आईच्या बाजूने उभी राहिली. एकीकडे ते सगळे गर्भपातासाठी आईशी भांडत होते. तर, दुसरीकडे गर्भपात करणे पाप आहे. असे मावशी ठामपणे त्यांना सांगत होती. त्यांच्या दृष्टीने पोटातल्या बाळाचे एका जनावराहून वेगळे महत्त्व नव्हतेच. समाजातील भयानक अशा विचार प्रवृत्तीचे ते बोलके उदाहरण होते. एक लहानगा जीव ज्याने अजून जगही पाहिलं नाही. त्याला संपविण्याच्या नुसत्या विचारानेच मावशी अस्वस्थ झाली. तिने आईचा गर्भपात करू देणार नाही, हे त्यांना अगदी निक्षून सांगितले. त्यामुळे यापुढे कमलाबाईशी व तिच्या मुलांशी आमचा काहीही संबंध नाही, असं म्हणून वडिलांकडच्या मंडळींनी आईला तिच्याच घरातून बाहेर व्हायला सांगितलं.
ज्या देवाचा आई तिन्ही त्रिकाळ धावा करायची, तो देव यावेळी मावशीच्या रूपाने तिच्या मदतीला आला. तिनेच आईला व तिच्या दोन्ही पोरांना आपल्या घरात आसरा दिला. आम्ही सर्व मावशीला ‘मोठमाय’ म्हणत असू. ती खरंच आमची मोठी आई होती. मोठमायचं घर एकाच खोलीचं होतं . घरासमोर एक ओटा होता. मावशीने म्हशीसाठी अंगणातच एक वाडा तयार केला. आईने आमच्या म्हशीचं नाव ‘मंगल’ ठेवलं होतं. आईचा मंगलवर फार जीव होता. तिच्यासाठी ती म्हैस केवळ एक जनावरच नव्हती, तर तिचा आधार होती. तिची मानसिक अवस्था आता अशी होती की मिळालेला लहानातला लहान आधारही तिला हवा होता. कधी – कधी आईचा धीर खचायचा. भविष्याच्या काळजीने ती अगदी घायकुतीला येई. अशा वेळी मग मोठमाय तिला धीर देत असे. प्रत्येकाचे दिवस येतात, तुझेही येतील, असं ती वारंवार आईला सांगत असे. आमच्या प्रेमळ मोठमायचं छोटंसं घर जणू धर्मशाळाच झाली होती. मोठमाय, मोठबाबा म्हणजे मावसा व त्यांची दोन मुलं, मामा, मामी व त्यांची चार मुलं, बया – बाबा आणि आता आई व तिची दोन्ही मुलं, अशी एकूण पंधरा माणसे त्या एका खोलीच्या घरात गुण्यागोविंदाने राहत होती.
घर कसलं ते! लाकूड फाट्यापासून बनविलेल्या भिंती व वर उसाच्या पाचटाचं छप्पर! पावसाळ्यात मात्र सर्वांचेच फार हाल व्हायचे. झोपडी दहा ठिकाणी गळत असे. अशा वेळी प्रत्येक ठिकाणी एक भांडे ठेवून सर्वजण जागा मिळेल तिथे झोपी जात. घरात एवढी माणसं होती, सर्वांनी परस्परांना मायेनं स्वीकारलं होतं. त्या घरात सुविधा नव्हत्या, पण अमाप समाधान होतं. आपल्या माणसांच्या मायेची ऊब होती… विशेष म्हणजे परिस्थितीविषयी कोणतीही तक्रार नव्हती.
पावसाळ्यातील एक दिवस माझ्या मनावर कायमचा कोरला गेला आहे. त्या दिवशी पाऊस निर्दयीपणे कोसळत होता. पाऊस असाच येत राहिला, तर नदीच्या पुरात आमच्या भिलाटीतील घरं वाहून जातील, या भितीनं सर्वांच्याच मनात घर केलं होतं. अवतीभवती सर्वदूर पसरलेला अंधार पावसाची सोबत करत होता. आजी, आजोबा, मोठमाय, मोठेबाबा, आई सगळी मोठी माणसं चुलीभोवती रिंगण करून चिंताग्रस्त बसली होती. शेणानं सारवलेल्या जमिनीवर आम्ही मुलंही अनोळखी भयानं एका तुटक्या गोणपाटावर पहुडलो होतो. पावसामुळं थंडीचा कडाका वाढल्यानं आईनं ठिगळं लावलेली गोधडी अंगावर टाकली होती. पाऊस मात्र जणू मुक्कामासाठीच आलेला होता. पावसाचा वेग वाढत गेला, तसं आमच्या झोपडीचं कमकुवत छप्पर जागोजागी गळायला लागलं. घरातील होती नव्हती फुटकी – तुटकी भांडी ठिकठिकाणी ठेवताना सर्वांची तारांबळ उडत होती. आम्ही लहान मुलंही लगबगीने त्यांच्या कामात हात लावत होतो. पण बेभान पावसापुढे आमचे प्रयत्न थिटे पडत होते. ओलाव्यामुळे वाढत जाणारा कुबट वास, निसर्गापुढं आपण सगळेच हतबल आहोत, जणू याचीच क्षणोक्षणी जाणीव मला करून देत होता.
पावसामुळे ओलसर झालेल्या झोपडीत कोरडी जागा शोधून आईने पुन्हा गोणपाट अंथरूण दिलं. त्या भयंकर रात्री मला झोप येत नव्हती. तीच अवस्था माझ्या भावंडांचीही होती. पण आम्हाला छान झोप लागली आहे, असं भासविण्याचा आम्ही प्रयत्न करीत होतो. म्हणजे तेवढीच मोठ्या माणसांची काळजी थोडी कमी व्हावी. आई, मावशी, आजी, आजोबांमधील चर्चा कानावर पडत होती. त्यांच्या चर्चेतील आईचं बोलणं माझ्या मनात खोलपर्यंत गेलं. तिचा शब्दन्शब्द माझ्या मनात घट्ट उमटला आहे. मोठ्या माणसांचं बोलणं लहानांसाठी संस्कारांचा मंत्र ठरत असतं. आमच्या दारिद्रयाला बेभानपणे झोडपून काढणाऱ्या त्या मुसळधार रात्री माझी आई मोठमायला म्हणत होती, ‘गळकं का असेना, पण आपल्या डोक्यावर छप्पर आहे; लाकूड – फाट्याच्या का असेनात, पण भिंती आहेत; थंडीत ऊब द्यायला झोपडीत चूल पेटली आहे; पण गरिबांचं कसं होत असेल या जीवघेण्या पावसात? आपण किती सुखी आहोत ! ‘आपण स्वत: किती गरीब आहोत, हा विचार सुद्धा माझ्या आईच्या मनाला स्पर्श करत नव्हता. तत्त्वज्ञानाचं शिक्षण तर सोडाच, पण कोणत्याही शाळेची पायरीसुद्धा न चढलेल्या या माणसांचा किती हा उच्च विचार ! हे सगळं नेहमीसाठी माझ्या काळजात रुतून राहिलं. आमच्या वाट्याला जे अवघड व संघर्षपूर्ण जीवन आलं होतं, ती गरिबी नाही, तर मग गरिबी म्हणजे आणखी काय ? न शिकलेल्या माझ्या आईच्या विचारात या प्रश्नाचं उत्तर होतं..“ गरिबी म्हणजे परिस्थिती नाही, तर गरिबी ही मन:स्थिती आहे. मोठा विचार करणं म्हणजे श्रीमंती, संकुचित विचार करणं म्हणजे गरिबी ! “आज नेमकी अडचण इथेच आहे. ग्रामीण काय किंवा शहरी काय !
क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं या पुस्तकातुन)
