मी एक स्वप्न पाहिलं ! डॉ.राजेंद्र भारुड (IAS) भाग ८

थोड्याशा अपयशानेही खचून जाणारी युवापिढी आज आपण पाहतो. आपल्या अपयशाचं खापर आर्थिक, सामाजिक परिस्थितीवर फोडताना जेव्हा मी तरुणांना बघतो तेव्हा मला खेद वाटतो. घरात शिक्षणाचा गंध नसताना, घरात दोनवेळच्या खाण्याचा प्रश्न असताना आईने व मावशीने निश्चयाने मला शिकवलं. कधीही परिस्थितीचा किंवा स्त्री असल्याचा त्यांनी बाऊ केला नाही. घरातच नव्हे, तर आमच्या समाजात शिक्षणाचा गंध नसताना, पितृछत्र माझ्या जन्माआधीच हरपलं असताना, रात्री चूल कशी पेटवायची? ही रोजची चिंता असताना, अशा प्रतिकूल परिस्थितीने मन:स्थितीवर मात करता येते, हे या दोन स्त्रीशक्तींनी जगाला दाखवून दिले.

https://bit.ly/bspmycityshrigonda

याच संस्कारांतून मला जीवनात पैशांनी गरीब असूनही मनाने अतिशय श्रीमंत असलेले आणि पैशांनी श्रीमंत असूनही मनाने गरीब असलेले अनेकजण अनुभवता आले. श्रीमंतीचं मापक पैसा नाही. श्रीमंती म्हणजे दुसऱ्यांना दिल्याने मनाला मिळणारे समाधान ! आमच्याकडे तेव्हा फक्त सणासुदीलाच गव्हाची पोळी होत असे. एरव्ही ज्वारी, मका, बाजरी किंवा नाचणीच्या भाकरीच आम्हाला खायला मिळत. त्यासुद्धा दोन – तीन दिवस पुरवून – पुरवून खाव्या लागत. दिवाळी, दसऱ्याला किंवा सणासुदीला गहू, तांदूळ मागून आणून किंवा उसनवार करून, कधीतरी चोरी करून सण गोड करता येत असे. मला आठवतं, अशाही परिस्थितीत दारात एखादा भिक्षूक आला, अगदी गाय जरी आली, तरी आई किंवा मावशी आम्हाला जेवायला वाढण्यापूर्वी त्यांना देत असे. दारात येणाऱ्या कुणालाच रिकाम्या हाताने पाठवू नये. आपल्याकडे जे आहे, जेवढं आहे, त्यातून दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करावा, असं आई आम्हा मुलांना सांगत असे. देण्यात काय समाधान असतं, हे आईने आपल्या कृतीतून आम्हाला शिकवलं. खरं तर आई किंवा मावशीच नव्हे; तर आमची अवघी भिलाटी पैशांनी खूप गरीब असली, तरी मनाने खूप श्रीमंत होती. जे आहे, जेवढे आहे त्यातून इतरांच्या अडचणी वेळी मदत करण्याची दानत त्यांच्याकडे होती. त्यामुळे त्यांच्या मनाची प्रचंड श्रीमंती आम्ही नेहमीच अनुभवली. देण्याची वृत्ती निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या या लोकांनी निसर्गाकडूनच घेतली असावी. मदत करणे, संवेदनशील असणे हे शब्द यांना माहीतही नाहीत, पण त्यांचा खरा अर्थ आपल्या कृतीमधून त्यांनी जगाला दिला. दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद असतो, हे बाळकडू मला येथूनच मिळाले.

“We make a living by what we Get, But we make a life by what we Give ” ”

पितृछत्र हरवलेल्या कुटुंबात आणि मनाची श्रीमंती असलेल्या आईच्या गर्भात माझ्यावर संस्कार होत होते. मावशीकडे राहायला आल्यानंतरच्या दिवाळीत मामा आपल्या कुटुंबासह गुजरातेत कामाच्या शोधात गेला. गावात आता काम नसल्यामुळे बऱ्याचदा जेवणाचे हाल होत. कधी – कधी घरात पीठच नसे. अशा वेळी सर्वांना आईची खूपच काळजी वाटत असे. तिला आता नववा महिना सुरू होता. अशात घरी खायला काहीच नसले, की मग मोठेबाबा कोणाच्या तरी शेतातून काही चोरून आणायचा व ते आईला खायला द्यायचा. अशाच उपाशी दिवसांतील एके दिवशी माझा जन्म झाला. ७ जानेवारी १९८८ ही माझी कागदोपत्री असलेली जन्मतारीख. पण माझा जन्म नेमका कोणत्या दिवशी झाला, हे कुणालाच ठाऊक नाही. मकर संक्रांतीच्या एक आठवड्याआधीचा तो दिवस असल्याचं आईला आठवतं. मी नाकी – डोळी अगदी आईवर गेलो होतो.

अगदी तिच्यासारखाच गहूवर्ण व लांब नाक. मावशी बऱ्याचदा माझ्या नाकाशी खेळत ‘इतला सोनाना पोर मायक आंडोर, आन तेले मारस का ?, असं म्हणून माझे लाड करत असे. मावशीमुळेच खरंतर मी हे जग बघू शकलो. माझं नाव ठेवण्यासाठी बारसंबिरसं करावं, असं कोणालाही वाटलं नाही. ती चैन गरीब भिल्लांना परवडणारी नव्हती. गावात एकदा असेच कोणी साधूपुरुष आले होते. त्यांना सहज म्हणून कोणीतरी माझं भविष्य विचारलं. तेव्हा त्या साधूनेच “ याचं नाव ‘राजेंद्र ठेवा”, असं सांगितलं. तेच माझं बारसं. घरच्यांना राजेंद्र’चा अर्थ तर माहीत नव्हताच, पण ते नाव उच्चारायलाही त्यांना कठीण जायचं, म्हणून मग सर्वजण मला राजू म्हणू लागले व पुढे मित्रांनी ‘राजूचा’ राजा ‘केला.

मोठमायच्या घरी मी लहानाचा मोठा होऊ लागलो. आईसुद्धा आता जुने दिवस विसरून येणाऱ्या दिवसाचा विचार करू लागली. गरोदर असताना वारंवार झालेल्या उपासमारीमुळे आता आईची प्रकृती बरीच खालावली होती. त्यामुळे आईचं दूध मला कमी पडायचं. सुदैवाने मोठमायने शेतकऱ्याकडून सोडवून आणलेली आमची ‘मंगल’ तोपर्यंत दुभती झाली. त्यामुळे माझी अतिरिक्त भूक तिच्या दुधावर भागू लागली. घरातही प्रथमच दूध, दही, ताक, तूप इत्यादी पदार्थ वारंवार दिसू लागले. बाबांनी सालदारकी सोडली होती. आता ते’ मंगल’ची आज दहा रुपयांत घर चालवायचं म्हणजे तारेवरची कसरतच होती. त्यामुळे आईनं आता भिल्लांचा पारंपरिक व्यवसाय ‘दारु काढण्याचं’ काम सुरू केलं. त्यासाठी भल्या पहाटे उठून ती बाबासोबत नदीवर जात असे. तीन दगडांच्या चुलीवर पारंपरिक पद्धतीने दारू काढून घरी आणत असे. या प्रक्रियेला दोन – तीन तास लागत. त्यानंतर मला झोळीमध्ये झोपवून ती कामावर निघून जात असे.

आईने काढून आणलेली दारू बया घरीच विकत बसे. दरम्यान भुकेमुळे अनेकदा उठून मी मोठमोठ्यानं रडायला लागायचो. माझ्या किरकिरण्यामुळे ग्राहकांना पिण्यात व्यत्यय निर्माण होत असावा. त्यामुळे कधीकधी ग्राहक मला शांत करण्यासाठी दारुचे काही थेंब माझ्या तोंडात टाकत असत. बया तर मला झोपवायचं असलं की सरळ तोंडात दोन चमचे दारू टाकून पाळण्यात टाकत असे. पुढे पुढे तर मी रडायला लागलो की, तोंडात दारू गेल्याशिवाय शांतच होत नसे. माझी दुधाची तहान अशी दारूने भागत असे. मी सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर असलो, तरी लहान असताना नकळतच मला दारुचं एक व्यसनच लागलं होतं. आणि माझ्या तोंडात दारू टाकताना आपण काही वाईट करत आहोत, असं कुणालाही कधी वाटलं नाही. अगदी आईलासुद्धा ! आजही आमच्या भिलाटीमधील परिस्थिती फार काही वेगळी नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत दारूचा वापर सर्रास व सहजपणे आजही केला जातो. (I had a dream! Dr. Rajendra Bharud (IAS) Part 8)

आजूबाजूच्या परिस्थितीचं, आपल्या दुःखाचं काही क्षणांसाठी का होईना, पण भान विसरायला लावणाऱ्या आपल्या गुणामुळे (?) आमच्या भिलाटीत दारू ही औषधासारखी वापरली जायची. बया तर, मी मोठा झाल्यावरसुद्धा, जर कधी खोकला झाला, तर मला चेट्ट फूल ‘म्हणजे घसा जाळणारी बिनपाण्याची दारू पिण्याचा सल्ला देत असे. पण तोपर्यंत मी अशा सल्ल्यांना हसून नकार द्यायला शिकलो होतो. बया जिवंत असती, तर आज डॉक्टर झाल्यानंतर मी तिला दारूचे दुष्परिणाम समजावून सांगू शकलो असतो. त्यावर, ‘तुले काय समजंस तेनामाधलं ? ‘असं म्हणून तिनं मला वेड्यात काढलं असतं. पण असं काहीही व्हायला आज बया व बाबा दोघंही हयात नाहीत. बयाची माझ्यावर खूप माया होती. घरात काहीही येऊ दे, मग ते मधाचं पोळं असो, जंगली बोरं, कैऱ्या किंवा बाजारातून आणलेला मुरमुऱ्याचा खाऊ असो, बया माझ्यासाठी सर्वांत मोठा वाटा बाजूला काढून ठेवायची आणि मुख्य म्हणजे त्यावर कुठल्याही भावंडाचा आक्षेप नसायचा. मोठमायच्या घरात मला अतोनात प्रेम मिळालं. बयाच्या मांडीची ऊब

क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading