कळा, उत्तम बंडू तुपे.(भाग १).

कळा, उत्तम बंडू तुपे..

उन्हाची आग झाली हुती . पाय इसत्यावर ठिवल्यागत वाटत हुतं, तरी चालत हुतो . दिवसा बरंच घर सोडलं हुतं . चार दिवस घरात बसून पायाला खुंट्या मारल्यागत झालेलं ; आता चालून चालून पाय नुसतं फुटायला झालं हुतं. आतनं मनबी उदासल्यागत; कुठं पायाला धर लागत नव्हता . वाळून गेलेल्या रानातला धुरोळा वाऱ्यानं उडत हुता. शेंगाची रानं फाळून पडली हुती .

म्हातूबाच्या वावरात आजून टाक्टर आरडत हुता . त्याचा आवाज तर कपळात बसलेला . फाळलेल्या रानातनं ढेकळं तुडवत निघालो ; चुकारीच्या शेंगा वेचत हुतो . घावतेल्या तस्या शेंगा खिशांत भरत हुतो . दोन्ही बी खिसं टाचून भरल्यावर धोतराचा वटा केला . घावतेल्या तेवढ्या शेंगा वेचायचं मनात हुतं . तवर वस्तीवरनं म्हातूबानं हाळी दिली . तोंडात पायतान हाणल्यागत वावरातनं पळालो .

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

वावरातनं बाहेर आल्यावर खिसं तोलून अंदाज केला . वट्यात नजर टाकली . दीड – दोन किलो तरी शेंग आसतेलच . दिवसभराचं काम केल्याचं समाधान झालं . वाळून रानांचा चुना झालेला एका अंगाला . अंगाला वुट्या काढल्यागत हिरवी रानं . हुर्द फाळून टाकत टाक्टर आरडत पुढ्यातनं निघून गेला . सगळीकडं आग लागल्यागत दिसत हुतं . जळक्या लाकडांचं खांब उभं केल्यागत रानोमाळ इजचं खांब . त्याच्याकडं बघून डोळं पांढरं हुत हुतं . पोटातली सगळी तर दुसऱ्या -चार चुळा आतडी काढून घिटल्यागत खांबांवरच्या तारा ; हातातली कामं काढून घिटली. हात बांधून टाकल्यागत झालंय ह्या तारखांबांनं. भर उन्हाचंच घरात येऊन बसलो . भाजलेलं पाय हुळहुळायला लागलं . खिशा ; वट्यातल्या शेंगा भाकरीच्या बुटीत टाकल्या . भाकरीची बुट्टी टम झाली . त्याच्याकडं बघून तेवडंच डोळ्याला सुख वाटलं .

तवा उन्हानं भाजलेलं घटकाभर इसरून गेलो . मुठभर शेंगा खाव्यात , वाटलं . घरात एकटाच हुतो . सांजचं सगळी मिळून खाव्यात ; मन मारून बसलो . घरात काय बसवना . आखं घर उखडू घातल्यागत गदमरायला लागलं हुतं . अंगातनं घामाच्या धारा . कष्ट करताना कवा इतका घाम आला नव्हता . घरात जीव तगमगाया लागला . भट्टीत घातल्यागत वाटाया लागलं . जीव अंबला हुता . तरी उठलो . पोटात ढवळल्यागत झालं . तोंडालाबी कोरड पडली हुती . तांबला भर पाण्यानं तोंड खंगळी केलं . तोंडात पाणी खळाखळा घोळून दोन टाकल्यावर घटाघटा पाणी घोटलं . तवा कुठं वाईच तरतरी आल्यागत झालं. घरभर नजर टाकली तर चांदण्या उगवल्यागत घरात उजेडाचं ठिपकं . वरनं आलेल्या उजेडाचं . वरचं शेकरान फाटलेलं . शेकरून घियाला यळ हुता कुणाला ?

घरात दम निघना तवा उठून दारातल्या लिंबाच्या झाडाबुडी आलो . तवा पाण्यात पडल्यागत जीव गार झाला . कडू वासानं जरा बरं वाटाया लागलं . वरखाली नजर फिरवली तर सगळा लिंब पिकून गळत हुता . पिकून पिवळ्या झालेल्या लिंबोळ्या सोन्याचं घोस लावल्यागत उन्हात दिसत हुत्या . उन्हानं तापलेल्या लिंबाचा वास शिजू घातल्यागत दरवळत हुता . लिंबाच्या झाडातनं सोनं फुटल्यागत दिसत हुतं . लिंबाखाली रसरशीत लिंबोळ्यांची पसरण ; सहज दोन लिंबोळ्या उचलून हातांत घिटल्या . लिंबोळ्यावर वासना झाली . अंबा चुरगळून चोखावा तसं लिंबोळी हालक्या हातानं हळुवार चुरघळली . लिंबोळीच्या आतला गर जिभेनं चाखला. तोंड गूळ खाल्ल्यागत गोड झालं . दुपारची यळ झाली हुती . या यळला कुणी इक दिलं आसतं तरी डोळं झाकून खाल्लं आसतं . ह्या तर लिंबोळ्या हुत्या . बारका हुतो तवा खेळात अंबा म्हणून कितिदा तरी खाल्ल्या हुत्या . भर दुपार झालेली . आतबाहेर देही आगीत घातल्यागत झालं हुतं . आगीत वलं काय , वाळलं काय – सगळंच जळतंय .

सोन्याचं मणी वेचून घिटल्यागत रसाळ , ताज्या लिंबोळ्या वेचून घेत हुतो . मिठाई खावी तश्या लिंबोळ्याच खात हुतो . कडुलिंबाची ही फळंबी दुपारच्या यळला पाच पकवान्नाचा घास नारायण घिटल्यागत वाटत हुतं . रित्या पोटाला भर घालत हुतो . नजरबी चोरट्यागत कावरीबावरी झाली हुती . तरी गावात चिटपाखरू नव्हतं . कुणीच बघाला नव्हतं , हे एक बरंच झालं हुतं . लई दिवसांतनं लिंबोळ्या खात हुतो . वरनं पाखरंबी न सांगता पाडून देत हुती . मोठं उपकार केल्यागत वाटत हुतं. साळुक्या , झनछडी , दोन – चार जातीची पाखरं लिंबावर हुती. झनछडीचं मांस कोंबडीच्या मासागत चवीला लागतं . उठून उभा राहिलो . धोंडा हातात घितला . तवर झनछड्या उडून गेल्या. हातातला धोंडा गळून पडला. निळ्याभोर अभाळाखालनं झनछड्या भिरभिरत चालल्या हुत्या . त्यांच्या मागनं नजर पळत हुती . झनछड्या खिंडीच्या बाजूला गेल्या . चव्हाणाच्या मळ्यातल्या अंब्याचा शेंडा नजरला पडला. लईदिस तिकडं गेलो नव्हतो . तिकडं जायाचंबी मनात हुतं . उन्हं आजून उतरली नव्हती . ह्या वक्ताला जायाचं ; पायाची होळी हुणार हुती . घरात तर दम निघत नव्हता . लिंबाच्या सावलीत हुतो तरी उन्हाच्या झळा अंगाला झोंबत हुत्या . त्यानं सगळ्याचीच कळा हारपून गेली हुती . सगळंच जळून गेल्यागत काळंकाळं दिसत हुतं . तसल्या उन्हाचं नारायण चव्हाणाच्या मळ्याची वाट धरली . कामाच्या आशेनं चाललो हुतो. वाटेवरचा धुरोळा चुलीतल्या राखेगत तापला हुता . तरी त्याच्यावर पाऊलं टाकत हुतो . एका धुमंत माळावर आलो .

माळावरची सवंदड एकटीच उन्हात घावली हुती . तिच्या सावलीत घडीभर उभा राहिलो . तिथनं नारायणाच्या मळ्यातलं गुन्हाळघर दिसत हुतं . एकटंच उन्हात तापत हुतं . गु – हाळ कवाच सरलं हुतं . सवंदडीची सावली नको – नको वाटायला लागल्यावर तावानं निघालो . उभा तलावांचा पाठ धरून पाटाच्या कडंकडंन निघालो . पाठ पाण्यानं भरून वहात हुता . खाली कुठं पाणी चाललं हुतं कुणाला ठावं ! मनात आलं आसंच पाठाच्या कडनं खाली – खाली जावं ; कुठं तरी काम घावंल . सोनं हरवल्यागत काम हुडकत हुतो . कामामागनं पळत हुतो . काम काय घावत नव्हतं . मगल लोची भांगलून घर चालवत हुत्या . त्याच्या रोजगारावर माझंबी पोट ; निदान आपल्या पोटापुरतं तरी कुठं काम बघावं पळत हुतो . गु – हाळ सरलं त्या वक्ताला नारायण चव्हाणाचा मळा सोडला हुता . मळ्यात काय काम राहिलं नव्हतं . सगळं रोजगारी मळ्यातनं निघालं तवा खुद नारायणानंच जा म्हणून सांगितलं . त्याला तरी आपली गरज ; पर कंबरंत लाथ घातल्यागत म्हणून रानोमाळ तसंच मनात ” त्यानं मळ्यातनं बाहेर काढलं . मनात नसताना मळा सोडला हुता . नसताना मळ्याकडं निघालो.

मोठ्या अंब्याबुडी आल्यावर उसास टाकून दम घितला . मळ्यात कुणीच दिसत नव्हतं.चौफेर नजर फिरवली तवा तालीच्या खालच्या वावरात किड्यांच्या पुंजक्यागत माणसं दिसली . नारायण छत्रीखाली बांधावर उभा दिसला . वाटलं पळत जावून त्याचं पाय धरावंत . पाया पडतो ; पर काय तरी काम लाव बाबा – म्हणावं . खरं तर रोजगाऱ्याला मान – अभिमान नसतो . घरातनं बाहेर निघायच्या आदूगर लाज चुलीजवळ ठिवावी लागती . चार पाऊलं पुढं गेलो तवर त्यानंच हाका मारल्या . ” कोण हाय ते अंब्याखाली ? ” ” मी संतू हाय . ” संतू व्हाय ? आरं , मंग उन्हाचं आला ते ? ” “ यावं म्हणलं . घरात बसूनबी काय दिवस जायना . ” आरं , मंग सकाळपासनं कुठं हुता ? ‘ ‘ हुतू की . ” मनात आलं- सांगावं- काम हुडकत फिरत हुतो . पर सगळंच खरं सांगून फसायचं न्हाय . ” आरं , कुठं हुता ? “ गोंदावल्याला गेलो हुतो . ‘ ” का ? काय काम हुतं रं गोंदावल्याला ? ‘ ‘ काम काय नव्हतं . आसंच गेलो गमतीनं . “ गमती करायला तू काय पुढारी हाय व्हय रं संतू ? ” “ न्हाय , तसं काय न्हाय . आपलं गेलो हुतो . ” “ आरं , हितं आमचं हाल कुत्रं खायना झालंय . आणखी तू आसा गमती करत फिर ! ‘ “ तर मंग काय करू ? ” ‘ काम न्हाय करायचं व्हय संतू ? हे बघ ; किती कामं उभी हायती . ढेपाळी नीट रचून ठिवायची . ती राख , राखुंडा , वाडं , पळकाट्या , बैजवार घालायचं हायतं . खोडव्याला कोंबारं फुटायला लागलेतं ; उसातल्या सऱ्या उजवून आता उसात पाणी सोडायला पायजी का नको ? ” “ तर , तर ! न्हायतर उसांचं कवळं कोंवारं जळून जातेलं की . ” नारायण बोलत हुता . मन हालकंफुल झालेलं .

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

आता हायगय नग ; आसीच कामाला मिठी घालावी वाटायला लागलं . ” ” ” मालक ! मंग काय करू सांगा . ‘ ‘ आत्ता . सांगू व्हय रं संतू ? मंग तर देव पावला . पर उदयाला ये की . तेवढी ढेपाळी रचून ठेव . ‘ ” हे निघालो बघा गुन्हाळघराकडं . ‘ पायांत वारं भरल्यागत गुन्हाळघरात आलो . सोनं घावल्यागत कामाला मिठी घातली . उन्हं कलती झाली तवा कामाला जुपी केली . सावल्या चांगल्या कासराभर लांब झाल्या हुत्या . हात कामात गुंतलं . मन लावून कामाला जुपून घिटलं ; तापलेली ढेपाळं ; पर हाताला काय ; भाजत नव्हती . पर त्याचं कायबी वाटत नव्हतं . बारा वर्षांचं तप फळाला आल्यागत वाटायला लागलं . विसावलेलं हात कष्टात रुतलं . अंगात खवीस आल्यागत झालं . पोटात आग पडली हुती तरी कामाला जुपून घितलेलं . ढेपाळं एकावर एक मांडून चवढी रचत हुतो . गुळाच्या ढेपा कवाच गावातल्या घराकडं गेल्या हुत्या . त्यानं सगळं गुन्हाळघर सुणंबुचं वाटायला लागलेलं . ढेपाळ्यांच्या बुडांत वारूळ फुटल्यागत मुंगळं वळवळत हुतं . चटावलेल्या माश्या गुन्हाळघर धरून फिरत हुत्या . त्यानं आख्खं गुन्हाळघर भणभणत हुतं. चरकांतनं निघालेली उसांची चिपाडं; पळकाट्या . उसांचं वाळून कोळ झालेलं वाढं गुऱ्हाळ – घराभोवती तसंच पडलेलं . सगळा पसरलेला पसारा बघून मनाला समाधान झालं . निदान महिनाभराचा रोजगार त्यात घावणार हुता . खोडव्याच्या फुटीगत आणखी कामाला कामं फुटणार हुती . ढेपाळ्यांतलं मुंगळं , माश्या कचाचा चावत हुत्या. त्यासनी खायाला कायबी नव्हतं .

तवा मला तोडून खायाला सगळीच उठली हुती नव्ह . लांब तिकडं राखेचा ढिगारा. गुन्हाळात हाताला लागलं ते चुलवणात घालून जाळलेलं . जाळव्याचं काम करत हुतो नव्हं . रात ना ध्याड गुन्हाळासंग देही जाळत हुतो. जाळापुढं देही जळून काळी झाली हुती . ह्या हातानं जे जाळलं त्याची राखबी ह्या हातानं उचलून वावरात घालायची. मातीत मिसळून टाकायची . ह्या सगळ्याच्या संगतीसोबतीनं आपूनबी एकदा मातीत मिसळून जावं वाटायचं. ढेपाळ्यांच्या चार चवढी बैजवार रचल्या. माठात चवढी उभ्या राहिलेल्या . त्याची सावली अंगावर पडली. तवा कुठं तंबाखूची तलाप झाली. खिशातला बटवा काढून तंबाखूची चिमट तळहातावर घेतली . डबीतला चुना वाळून गेला हुता. तरी नखलून काढला. तंबाखूत मिसळून तंबाखू मळली. तंबाखू मळता मळता गुन्हाळघरापुढच्या रानात नजर टाकली. खोडव्याला फुटलेलं उसाचं…

क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading