कळा, उत्तम बंडू तुपे.(भाग ११).

कळा, उत्तम बंडू तुपे..

हिरवीगार द्राक्षाची बाग ! आयनं पदर पसरल्यागत पदराच्या सावलीत आसल्यागत वाटलं. एकदा सगळ्या बागंवरनं नजर फिरवली. हातांतली कातर, कातरीची पाती उन्हात लखलखली. उभं राहयाला म्हणून घेतलेलं तेलाचं मोठं टिपाड फुढे सरकवलं. एकदा चौफेर नजर टाकली. वेलांचं तणारं मांडवाच्या तारेला धरून आधारानं लांबलं हुतं .

कापणी यवस्तीत झाली पायजी . वेलाच्या कवळ्या फुटी ; बळ्या काढून टाकायला पायजी ; बाळाचं जवळ वाढल्यागत द्राक्षाचं वेलं . सपासपा कातर चालली हुती. हिरव्या पाल्याचा कापनं ; खाली ढिग साचत हुता. जून झालेल्या वेलाच्या पिवळ्याचुटूक सोन्यासारख्या काड्या लांबवून सुतूळीनं बांधतबी हुतो. वेलावर मारलेल्या येड्रीलचा कसणूसा वास ; वासानं जीव गुदमरत हुता . तरी कामात जीव घातला हुता. येड्रील पोटात गेलं तरी माणूस मरतं. मरान टक्कूरीवर घेवून द्राक्षाची कापनी चालली हुती. चार – पाच वेलाची कापणी झाल्यावर नारायण मालक आला. त्याचं डोळं कापलेल्या वेल्यावर . ” संतू ! कापणी बैजवार झाली पायजे . ह्या पिवळ्या काड्यांतनं उदया सोनं उगवणार हाय. ह्या काड्यांची बैजवारीनं बांधणी झाली पायजी .

‘मालक ! मी काय नव्यानं काम करतोय काय ? वेलाची कुठली काडी ठिवायची ; कुठली न्हाय हे काय मला माहिती न्हाय व्हय? ” नारायण नुसता हासला. खाली उसाच्या वावरांकडं गेला. पळाटी भोगलाय बसलेल्यांतली सुबीवरल्या बांधानं खाली तालीत उतरली . वेलांत दडलेली पाल सरासरा पळाली. डोळं तेज झालं . टिपाडांवर उभं राहून मान उचलून बघत हुतो. काय दिसंना तवा टिपाडावरनं उडी मारून खाली आलो. कातर टिपाडावर ठेवली. आडबगलनं लपत दडत गेलो ; लांब तिकडं बांधावरच्या नेपतीच्या झाडाआड परसाकडं बसल्याचं सोंग करून बसलो. आपल्याच मालकीचं आसल्यागत नारायण सुबीला ; सुबी मालकाला ; नि दोघंबी एकमेकाला मिठी मारून बसलेली .

त्यासनी काय वाटत हुतं का नव्हतं कुणाला ठावं ! माझं हुर्द मातर धडाधडा ऊराला धडका घियाला लागलं. सुबी नवऱ्याची बायको हुती. लगीन झालं. नवरा कमईला गेलाय त्याचीबी ही हौस पुरी झाली नसंल. हिची सासू , सासराबी खुशाल कामाला जा म्हणून सांगतोय. ही सुबी हिकडं ; ही कामं करती. ज्यानं कमई करायला जावं त्यानं आपलं बि – हाड संग न्यावं हे लई बेस . डोळ्यादेखत सगळं चाललं हुतं ; काय इलाज नव्हता. अंगातलं सगळं औसान काढून घितल्यागत नेपतीआडणं उठून मीच चोर आसल्यागत द्राक्षाच्या बागंत आलो . कामावर काय चित्त लागंना . मनाचं दोन भाग झालं हुतं ; कापून टाकलेल्या वेलाच्या पाल्यागत . माझा मी तुटून गेलो हुतो . कामातनं मन उठलं हुतं . अंगात बळ नव्हतं खरं ; जुलमानं कातर हातांत घेतली हुती . टक्कूरं जाग्यावर नव्हतं . ” संतू ! वाईच हिकडं ये. ” नारायण बोलवत हुता . सावकाश टिपाडावरनं खाली उतरलो .

पाय वढंत वढंत मालकांपुढं येवून उभा राहिलो. ” संतू ! उदयापासनं पयल्यागत कामाला ये . तुला काय म्या माझा मळा बंद केला न्हाय ; आरं , लोकाच्यात जान्यापेक्षा हिथं या ; कामं करा . उदया बायकोला , पोरीलाबी घेऊन ये . काय देतोय राऊत त्या दोघीला ? माझ्याकडं रोजगारी काय रोजगार घेत्यात ? ” मालक ! हाय तिकडं ते बरं हाय ; रोजगार काय का आसना . ‘ संतू ! नेपतीच्या आड काय करीत हुता रं ? ” ‘ काय न्हाय . परसाकडं बसलो हुतो . ‘ तुला तीऽच जागा बरी घावली .” ” व्हाय . आडूसा हुता म्हणून बसलो . ” ” पुन्हा बसू नगस तिथं गुपीत मसूबा हाय . ‘ ” व्हय ; मला ठावं नव्हतं ; कुणी म्हणतंय तिथं गुपीत मावलाया हायत्या ; आता मावलाया – म्हसूबाचा मेळ झाला नव्हं मालक ! ” बोललो . नारायणचं डोळं मोठं झालं . “ सत्या ! गावात राह्याचंय तुला . ह्या कानाचं त्या कानाला झालं तर याद राख . ‘ कशाबद्दल बोलताय हे मालक ? ” ” तुला सगळं ठावं हाय ; तू बघत हुतास . ” मला कायबी ठावं न्हाय ; म्या कायबी बघिटलं न्हाय .

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

” मला खोटं सांगू नगस . मला नाऱ्या चव्हाण म्हणत्यात . जर का हे कुणाच्या कानांवर गेलं , तर तुझी धडगत न्हाय संत्या ; सांगून ठेवतोय . ” हाग्या दम भरून मालक हिरीवर गेला . त्याच्या पाठणीला माझं डोळं चिकटल्यागत ; मालक हिरीत उतरला ; घटकाभरानं वर आला तरी तसाच उभा राहिलो . मळा पारोसा झाल्यागत वाटायला लागलं . दिवस मावळायला गेला . कातर घेऊन वस्तीवर गेलो . हास म्हणल्यागत मालक हासला . मुलखाचा चिकट नारायण . त्यानं खिशातनं धाच्या दोन नोटा काढल्या . ” संतू ! आता पाऊस उघडलाय ; बरडात हीर धरावी म्हणतोय .” मालक ! हिरीतरी किसत्या पाडताय? ” ‘ आरं , लागतंय पाणी म्हणून पाडायच्या . ‘ व्हय , पाढा . पर हे रुपय ? ‘ ‘ आजच्या अर्ध्या रोजगाराचं काम . आणखी मागच्या कामाचं . ‘ मागच्या कामाचं जत्रंच्या वक्ताला दिल हुतं की . ” ” तुझ्या न्हाय घेणात ; तुझं मागचं रुपयं हुतं माझ्याकडं; आरं , गरिबाच्या कष्टांचं आमाला नगं . घराकडं निघालो हुतो . रोजगारी बायका पुढं गेल्या हुत्या . सुबी मातर आजून बांधानं फिरत हुती . उसाचं वाळलं बुडखं वेचत फिरत हुती .

संजच्या सैपाका खाली जाळून भाकरी भाजायला जळन वेचत हुती . हेच्यावर सैपाक करून सासू सासऱ्याला घालणार हुती . धाच्या दोन नोटा ; म्याबी खिशात घातल्या . घराकड निघालो . तरी सारखा मागं फिरून बघत हुतो . पुढं पाय , मागं देही ; आसली गत झाली हुती . आसंच जावं . बसलेल्या सासऱ्याला सांगावं – तुझी सुण काय “त्यालाबी एक करतीय बघ . त्याच्या तोंडापुढणं पुढं निघालो तवा त्यानंच इचारलं , “ संतू ! सुबी कुठं दिसलीय का ? आजून तिचा पत्त्या न्हाय . ” सगळं सांगावं वाटलं . पर तसंच तोंड दाबून पुढे निघालो . काय बोललो न्हाय . पाय घराच्या वडीनं निघालेलं . न्हाव्याच्या घराच्या कोपऱ्याजवळ आलो ; तर संपत लिंबाखालनं येताना दिसला . त्याला बघून टक्कूऱ्यात तिडीक उठली . पोटात हात घालून कुणी काळीज तोडतंय वाटलं . तावानं पुढं गेलो ; तर मंगल उभऱ्यात बसली हुती . तावानं गेलो . काय इचारलं – पुसलं न्हाय . ताड करून एक तडाखा हाणला . ” आयला तुझ्या ; बघावं तवा उभऱ्यात . तिन्ही सांजला उभऱ्यात बसू नगं म्हणून किती डाव सांगितलं . काय ग्यान हाय का न्हाय ? का टक्कूऱ्यातला मेंदू पार नासला ? ” मंगलला तडाखा हाणून घरात गेलो . तावाला दुर्व्या धावला . लाथ घातली . लोची चुलीपुढं बसली हुती . तिच्यावर तोंड सोडलं – “ गतकाळे ! तुला सांगितलेलंबी समजत न्हाय काय ? तू बाय , हाय का कोण ? ” “ झालं काय इतकं कावायला ? ” झाली तुझी . ” जे व्हणार हाय त्याच्या आदी आपलं सुदून राहावं ; पाण्याआदी वळाण बांधलेलं बरं . ‘ “ आवं ; परं झालं काय ? ”

” ते चव्हाणाचं बेनं हिकडं कशाला आलं हुतं . ते सांग आदी. ‘ “ दुर्व्याला इचरा; मला काय इचारता ? ” दुर्व्याचं नाव घिटल्यावर दुर्व्याकडं वळलो . मंगल थोबाड चोळत चुलीपुढं येवून बसली . चूल चांगली भडकली हुती . जाळाचा सावट मंगलच्या अंगावर पडला हुता . डोळ्यांत जाळ साठवल्यागत डोळं दिसत हुतं . “ जवा , तवा संशव धरतूय ; मारतूय . ह्याच्या मनात तरी काय हाय गं आये ? ” दुर्व्याला धरून हेबाळला , “ ये कडूबेन्या ! ते चव्हाणाचं गाबडं कशाला आलं हुतं ? ” “ बापू ! मला इंग्रजी येत न्हाय ; तवा तो म्हणाला- मी शिकवीन ; येत जाईन शिकवायला . तवा आला हुता . ” त्या आय घाल्याला काय येतंय ? शिकवाय तो काय मास्तर हाय व्हय ? हिला बोटातला काटा काढायला ते बेनं पायजी ; तुला इंग्रजी शिकवाय तेच . आरं , ह्या गावात दुसरं कुणी घावत न्हाय व्हय तुमाला ? ” पुढं दिसलं त्याला तडाखं देत हुतो . टक्कूऱ्यालाच तडा गेल्यागत झालं हुतं . घरात पडलेली आमचीच सावली..

क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading