दिनांक १९ फेब्रुवारी २०२६,अहिल्यानगर:
श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव येथे किरकोळ वादातून झालेल्या भाऊसाहेब नामदेव राजपूत यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी महेश किरास चव्हाण आणि शैला महेश चव्हाण या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) हत्तीबारव (ता. अहिल्यानगर) परिसरातून शिताफीने अटक केली आहे.
दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी रात्री, फिर्यादीचा मुलगा शुभम आणि आरोपी महेश चव्हाण यांच्यात दुपारी झालेल्या भांडणाचे पर्यावसान मोठ्या वादात झाले. आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून शुभमच्या घरावर हल्ला केला. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेले भाऊसाहेब राजपूत यांच्या छातीत महेश चव्हाण याने धारदार शस्त्राने वार केले.
उपचारादरम्यान राजपूत यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) सह अन्य कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले होते.
तपासादरम्यान, आरोपी जामखेड रोडवरील हत्तीबारव येथे असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून १) महेश किरास चव्हाण (वय २५) आणि २) शैला महेश चव्हाण (वय २७) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
मुख्य आरोपी महेश चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात यापूर्वी दरोडा (३९९, ४०२), जबरी चोरी (३९२) आणि घरफोडी (४५७, ३८०) असे गंभीर ५ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पीएसआय महादेव गुट्टे, समीर अभंग आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. पुढील तपासासाठी आरोपींना श्रीगोंदा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

