#कोळगाव मुरुम चोरी प्रकरण : शेतकऱ्याच्या जमिनीवरून १०० ते १२० ब्रास मुरुमाची चोरी, तहसिलदारांना तातडीने कारवाईची मागणी..

श्रीगोंदा (१८ जून २०२५) प्रतिनिधी

कोळगांव (ता. श्रीगोंदा) येथील एका शेतकऱ्याच्या मालकीच्या जमिनीवरून मध्यरात्री जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुमारे १०० ते १२० ब्रास मुरुम चोरी केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. यासंदर्भात शरद संभाजी लगड या शेतकऱ्याने श्रीगोंदा तहसिलदार कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला आहे.

शरद लगड हे कोळगांव येथील रहिवासी असून ते शेती व्यवसाय करतात. त्यांच्या व इतर दोन व्यक्तींच्या संयुक्त नावावर गट नंबर २/२ मधील एकूण २ हेक्टर १२ आर क्षेत्र आहे. दिनांक १५ जून २०२५ रोजीच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी जेसीबी मशीन व तीन ट्रॅक्टरच्या सहाय्याने या जमिनीतील वहिती क्षेत्रामधून मुरुम उत्खनन केले. चोरी करून तो मुरुम स्थलांतरित केला गेल्याचे शरद लगड यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे.

या प्रकारामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांनी तहसिलदार कार्यालयास सदर घटनेची तात्काळ दखल घेऊन पंचनामा करावा, नुकसान भरपाई द्यावी आणि दोषींवर फौजदारी गुन्हे नोंदवून दंडात्मक कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे.

शेतकऱ्याच्या अर्जाची प्रत मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांनाही दिली असून, या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. ही मुरुम चोरी कोणाच्या संगनमताने झाली याचा तपास लावणे आणि अशा प्रकारांना आळा घालणे गरजेचे असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.

मुरुम चोरी प्रकरणांमुळे महसूल विभागाची कार्यपद्धती व गावात अवैध उत्खननावर नियंत्रणाच्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणेची कार्यक्षमता पुन्हा प्रश्नाच्या भोवऱ्यात आली आहे. आता तहसिलदार व महसूल विभाग याबाबत काय कारवाई करतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

स्रोत:(निवेदन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading