दिनांक १० नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:
कोळगाव परिसरातील महत्त्वाचे राजकीय नेतृत्व असलेल्या हेमंत नलगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचारात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने या निवडणुकीला अनपेक्षित वळण मिळाले आहे. नागवडे यांना या पाठिंब्याने जोर मिळाल्याने राहुल जगताप यांचा मतदारांवरील प्रभाव कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोळगाव हे राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील गाव असून येथे पाचपुते, नागवडे व जगताप या तिघांचेच प्रभाव आहे. जवळपास १० हजार मतदार असलेल्या या गावात नेहमीच राजकीय नेत्यांची आकर्षण स्थळ राहिली आहे. आगामी विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या तिघांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली असून कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे.
हेमंत नलगे यांची भूमिका अनेक दिवस गुलदस्त्यात होती, ज्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता. ग्रामपंचायत निवडणुकीत जगताप व नागवडे यांनी नलगे यांच्या गटाला मदत केल्याने त्यांनी आता या दोघांवर नाराजी व्यक्त केली होती. तीन-चार दिवसांपासून राजेंद्र नागवडे यांनी नलगे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत अखेर त्यांना आपल्या बाजूला खेचण्यात यश मिळवले आहे.
हेमंत नलगे यांनी नागवडे यांच्या समर्थनाचा निर्णय घेताच जगताप गटाला धक्का बसला आहे. यापूर्वी जगताप व नागवडे यांच्या समर्थकांनी एकत्रितपणे काम केले होते, पण आता नलगे यांचा नागवडे यांच्या बाजूने झुकाव झाल्याने जगताप समर्थकांनी तातडीने बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पुन्हा जगताप यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे कोळगावातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला आहे.
नलगे यांनी नागवडे यांच्या समर्थनात उतरल्यानंतर जगताप समर्थक असलेल्या विजय नलगे, दामू साके, विश्वास थोरात, मच्छिंद्र नलगे, नितीन डुबल आणि इतरांनी तातडीने बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी माजी आमदार राहुल जगताप यांच्या प्रचारासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले.
स्व. शिवाजीराव नागवडे यांच्या एक बहिण लगड कुटुंबात तर दुसरी नलगे कुटुंबात असल्याने, नागवडे यांनी या दोन्ही घराण्यांना एकत्र आणण्यात यश मिळवले आहे. विद्यमान सरपंच पुरुषोत्तम लगड हे नागवडे यांचे नातेवाईक असूनही ते पाचपुते यांच्यासोबत होते. परंतु, हेमंत नलगे यांना आपल्याकडे वळवून नागवडे यांनी कोळगावात आपला प्रभाव वाढवला आहे.
स्रोत:( प्रसिद्धी पत्र )




