‘ट्रायमॅक्स’चा पहिला सर्व्हे आला, श्रीगोंद्यातील फाईट जगताप-नागवडे यांच्यात; पाचपुते तिसऱ्या क्रमांकावर तर अण्णासाहेबांना निर्णायक पसंती.

दिनांक १२ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:

विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवारीच्या घोळावरून राज्यात गाजलेला श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघासाठी ‘ट्रायमॅक्स’ या नामांकित सर्व्हे एजन्सीचा पहिला सर्व्हे बाहेर आला आहे. यामध्ये अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांच्याकडे सध्या मतदारांचा कल दिसून येत आहे, तर महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांनी महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांना मागे टाकत दुसरा क्रमांक मिळवला आहे.

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघावर शरद पवार यांचा मोठा प्रभाव आहे. त्याच अनुषंगाने इथे राष्ट्रवादी काँग्रेस (शप) च्या उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होती. पण ही जागा आश्चर्यकारकरित्या शिवसेनेला जाऊन अनुराधा नागवडे उमेदवार झाल्या आणि राष्ट्रवादीचे राहुल जगताप यांनी बंडखोरी केली. तर महायुती कडून भाजपने प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिलेली पण विक्रम पाचपुते यांनी पक्षाची परवानगी नसताना, परस्पर आईचा उमेदवारी अर्ज माघारी घेत स्वतः उमेदवारी केली. वंचित बहुजन आघाडीने देखील इथे अण्णासाहेब शेलार यांच्या रूपाने तगडा उमेदवार दिल्याने श्रीगोंद्यात चौरंगी लढत अनुभवयाला मिळत आहे.

‘ट्रायमॅक्स’ ने ६ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर या ५ दिवसीय कालावधीसाठी श्रीगोंदा व नगर तालुक्यातील मतदारांचा पहिला सर्व्हे केल्यानंतर यात राहुल जगताप यांना मतदारांची पसंती असल्याचे दिसून आले आहे. कार्यकर्त्यांचा वाढता पाठिंबा जगताप यांना तारणार असल्याची चिन्हे आहेत तर अनुराधा नागवडे यांना महिला म्हणून मिळत असलेली सहानुभूती त्यांना थोडी फार उजवी ठरत असल्याचे चिन्हे आहेत. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे भाजप महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते हे आजरोजी तरी या सर्व्हेत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.

अपक्ष राहुल जगताप व महाविकास आघाडी शिवसेनेच्या अनुराधा नागवडे यांच्यात आज रोजीच्या आकडेवारी नुसार ५% चा फरक आहे, यात राहुल जगताप २८% सह पहिल्या क्रमांकावर तर अनुराधा नागवडे २३% घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असणारे भाजपचे विक्रम पाचपुते २२% वर आहेत. नागवडे-पाचपुते यांच्यात अवघ्या १% चा फरक असल्याने त्यांना आपपला टक्का वाढवण्यासाठी जोर द्यावा लागणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे अण्णासाहेब शेलार यांना देखील आज रोजी तब्बल १९% पसंती दिसत असल्याने त्यांची उमेदवारी निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. अण्णासाहेब शेलार यांचा वाढता टक्का तिघांसाठी घातक असला तरी ओबीसी मतांमुळे अण्णासाहेब शेलार यांचे पारडे सुद्धा ऐनवेळी जड होऊ शकते असा अंदाज ‘ट्रायमॅक्स’ने वर्तवला आहे.

निवडणुकीला अजून आठवडाभराचा कालावधी बाकी असल्याने वातावरणनिर्मिती आणि अर्थकारण यावर बरीच गणिते अवलंबून राहणार आहेत. त्यामुळे सर्व्हेच्या आकडेवारीत सुद्धा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच अनुषंगाने ‘ट्रायमॅक्स’ निवडणुकीच्या आधी अजून दोन सर्व्हे निष्कर्ष देणार आहे. आपला दुसरा सर्व्हेक्षण अहवाल १४ नोव्हेंबर रोजी तर तिसरा अहवाल १८ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केली जाईल अशी माहिती ‘ट्रायमॅक्स’च्या वतीने देण्यात आली आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनूसार)

जाहिरात…

Leave a Reply