दिनांक ७ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:
गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांनी महाराष्ट्राचे विघटन करण्यासाठी आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडली. उद्धव ठाकरे यांचे सरकार खाली खेचले. आता त्याच मंडळींनी श्रीगोंदा मतदारसंघात एक अधिकृत आणि एक अपक्ष उमेदवार उभे करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांना रोखण्यासाठी लोकांनी महाविकास आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले. तालुक्यातील वांगदरी येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांच्या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
प्रमुख उपस्थिती: या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी भूषवले होते. खा. राऊत यांनी आपल्या खास शैलीत भाजप आणि अपक्ष उमेदवारांवर तिखट शब्दात टीका केली.
भाजप आणि अपक्ष उमेदवारांवर खा. राऊत यांची टीका: खा. राऊत म्हणाले, “स्व. शिवाजीराव नागवडे यांनी साडे सात वर्ष आमदार राहून मतदारसंघाचा कायापालट केला, तर विरोधी आमदारांनी ४० वर्षे प्रश्न प्रलंबित ठेवले. अपक्ष उमेदवाराने आमदार असताना रस्त्यांचे काम केले नाही, मात्र आता ते रोड रोलर घेऊन फिरत आहेत. रोड रोलरचा वेग सगळ्यांना माहिती आहे. हा रोड रोलर खड्ड्यात अडकून पडणार आहे. शेतकऱ्यांचे पैसे थकवणाऱ्या व्यक्तीला पक्ष उमेदवारी कसा देईल?”
सौ. अनुराधा नागवडे यांची जोरदार टीका: यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांनीही भाजप आणि अपक्ष उमेदवारांवर चौफेर टीका करताना, “समोरील उमेदवाराच्या आईने माझ्यावर टीका करताना मला गांधारीची उपमा दिली. पण उन्हाळ्यात पाणी नाही, रोजगार नाही, एमआयडीसी नाही, साकळाई उपसा सिंचन योजना पूर्ण झाली नाही, या जनतेच्या समस्यांना तुम्ही कोणती उपमा देणार?” असा सवाल केला. भाजप उमेदवार महिला सन्मानाच्या नावावर प्रचार करत आहेत, पण आईची उमेदवारी स्वतः घेतली. घरात चुलत भावाऐवजी सख्या भावाला उमेदवारी दिली. हे युवक आणि महिला सन्मान कसा?”
स्व. शिवाजीराव नागवडे यांचे नाव वापरणाऱ्या उमेदवारांवर आरोप: सौ. नागवडे म्हणाल्या, “राज्यात उद्धव ठाकरे यांचा पक्ष चिन्ह एकनाथ शिंदेंनी घेतले. त्याचप्रमाणे अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी स्व. शिवाजीराव नागवडे यांचे नाव वापरून खोटे प्रेम दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, हे बेगडी प्रेम जनतेच्या समोर आले आहे.”
महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण – बाबासाहेब भोस: सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना व्हॉईस चेअरमन बाबासाहेब भोस यांनी मतदारसंघात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असल्याचे सांगितले. नागवडे यांच्या विकासकामांवर जनतेचा विश्वास असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
हशा पिकवणारे वक्तव्य: खा. राऊत यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवत बंडखोर उमेदवारांवर टीका करताना म्हणाले, “महाविकास आघाडीतील बंडखोर उमेदवार प्रचारात शरद पवार, राहुल गांधी, स्व. शिवाजीराव नागवडे यांचे फोटो वापरत आहेत. पण त्याचा काही उपयोग होणार नाही. त्याऐवजी विजयी झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो लावायला हवा.”
स्रोत:(आयोजीत सभा)




