श्रीगोंद्यातील राजदीप जिनिंग ॲंण्ड प्रेसिंग मिलला स्थानिक रहिवाशांचा विरोध..

दिनांक १८ जानेवारी २०२४, श्रीगोंदा:

शहरातील वार्ड क्रमांक २ सिद्धिविनायक शिक्षक कॉलनी, शाहू नगरच्या बाजूला नव्याने सुरू झालेल्या राजदीप जिनिंग ॲंण्ड प्रेसिंग मिलला स्थानिक रहिवाशांनी विरोध केला आहे. या मिलचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने यासंदर्भात नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना स्थानिक रहिवाशांनी निवेदन दिले आहे.

या निवेदनात नागरिकांनी असे म्हटले आहे की, राजदीप उद्योग हा कापसावर प्रक्रिया करणारा असल्याने श्र्वसनावरील आरोग्याचे प्रमाण, दिवसा, रात्री-अपरात्री जड वाहनांची ये-जा चालू असते. तसेच, कर्कश हॉर्नच्या आवाजाने ज्येष्ठ नागरिक व लहान मुले यांना त्रास होतो. शेतकऱ्यांची वाहनेही येथे कापूस घेऊन येत असतात. वाहनातील कापूस मोकळा असल्याने तो रस्त्याच्या दुतर्फा पडून, अस्वच्छता निर्माण होते. रस्त्यावर आणि घरात या वाहनांमुळे धुळीचे साम्राज्य वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचबरोबर येथील रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्याने वाहने बेदारकारपणे चालविली जातात. अपघात होण्याच्या भीतीने येथील नागरिक भयभीत झाले आहेत. त्यांना रस्त्यावरून फिरणे कठीण झाले आहे. याशिवाय अवजड वाहनांमुळे रस्त्यावरील वीजवाहक तारा, लाईट कनेक्शन तुटण्याची भीतीही निर्माण झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दुसरे असे की, या मिलमध्ये राज्याबाहेरील मजूर काम करीत आहेत. त्यांना पुरेशा भौतिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढून स्वच्छता व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.

एकूणच या परिसरात अशांतता, अस्वच्छता, भयभीतता, अनारोग्यता हे प्रश्न निर्माण झाले आहेत. यामुळे सदर जिनिंग मील त्वरित बंद करून, नागरिकांच्या वसाहतीपासून अन्यत्र दूर अंतरावर हलवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा मोठ्या स्वरुपात आंदोलन उभारण्यात येईल. असा इशाराही स्थानिक नागरिकांनी श्रीगोंदा नगरपरिषदेला दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पणन अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.

स्त्रोत:(प्रसिध्दी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading