दाणेवाडीतील माऊली गव्हाणे खून प्रकरण उघड; स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत आरोपी गजाआड..!

दिनांक १६ मार्च २०२५,अहिल्यानगर:

श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे घडलेल्या एका भीषण खून प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत आरोपीला अटक केली आहे. हा खून १२ मार्च रोजी उघडकीस आला होता. मृतदेहाची ओळख गुप्त होती, परंतु पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व तपास यंत्रणांच्या आधारे मृताची ओळख पटवत आरोपीला बेड्या ठोकल्या.

१२  मार्च रोजी दाणेवाडी (ता. श्रीगोंदा) येथील विठ्ठल दत्तू मांडगे यांच्या शेतातील विहिरीत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे, त्या मृतदेहाचे मुंडके, दोन्ही हात आणि उजवा पाय वेगळे करण्यात आले होते. मृतदेह पोत्यात भरून टाकल्याने प्रथमदर्शनी हा हत्या प्रकरण असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची तक्रार पोसई मारूती कोळपे (नेमणूक बेलवंडी पोलीस स्टेशन) यांनी दिल्यानंतर बेलवंडी पोलीस ठाण्यात भादंवि कलम १०३, २३८ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तपासाची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवली. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळी भेट देऊन चौकशीला सुरुवात केली. या पथकात पोसई तुषार धाकराव, पोलीस अंमलदार बापूसाहेब फोलाणे, शाहीद शेख, बिरप्पा करमल, अरुण गांगुर्डे, संतोष खैरे, रविंद्र घुंगासे, आकाश काळे, विशाल तनपुरे, सागर ससाणे, प्रमोद जाधव, रोहित मिसाळ, अशोक लिपणे, अमोल कोतकर, मनोज लातुरकर, जालिंदर माने, फुरकान शेख, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे व महादेव भांड या अधिकाऱ्यांचा समावेश होता.

तपास पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, जिल्ह्यातील तसेच शिरूर पोलीस ठाण्यातील मिसिंग व्यक्तींची माहिती ताब्यात घेतली. मृताच्या अंगावरील कानातील बाळी आणि इतर लक्षणांवरून नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. चौकशीत मृतदेह हा माऊली सतीश गव्हाणे (वय १९, रा. दाणेवाडी, पो. राजापूर, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याचा असल्याचे निष्पन्न झाले.

तपास सुरू असताना पोलिसांना तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे खून करणाऱ्या आरोपीचा शोध लागला. सागर दादाभाऊ गव्हाणे (वय २०, रा. दाणेवाडी, ता. श्रीगोंदा) याने हा गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन ताब्यात घेतले असता, त्याने विश्वासात घेतल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली. प्राथमिक तपासात आरोपीने वैयक्तिक कारणांमुळे हा निर्घृण खून केल्याचे समोर आले आहे.

या संपूर्ण तपास व अटकेसाठी पोलीस अधीक्षक मा. राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक मा. प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली. आरोपीविरोधात पुढील तपास सुरू असून, अधिक चौकशीत हत्या करण्यामागील नेमके कारण आणि त्याला मदत करणारे आणखी कोणी आहेत क.?, याचा शोध घेतला जात आहे.

स्रोत:(अहिल्यानगर पोलीस)

Advertise.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading