“घराणेशाही संपवण्यासाठी माझी उमेदवारी – जनतेचा विश्वास आहेच!” – सुवर्णा पाचपुते यांची आक्रमक भूमिका

दिनांक ९ नोव्हेंबर २०२४, कोळगाव, श्रीगोंदा:

पक्षाकडे अधिकृत उमेदवारी मागूनही घराणेशाहीचा अडथळा येऊन निलंबनाचा सामना करावा लागल्याने खंत व्यक्त करत, भाजपच्या बंडखोर व अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांनी श्रीगोंदा मतदारसंघात घराणेशाहीविरुद्ध जोरदार भूमिका मांडली आहे. कोळगाव येथे प्रचारात आलेल्या पाचपुते यांनी आपल्या उमेदवारीचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, “श्रीगोंदा मतदारसंघाच्या विकासासाठी तसेच जनतेच्या मागणीनुसार भ्रष्टाचारमुक्त, निर्भीड उमेदवारी देत आहे.”

पाचपुते यांनी श्रीगोंदा मतदारसंघात घराणेशाहीमुळे विकास थांबल्याचा आरोप केला. “तालुक्यातील अनेक राजकीय नेते आलटून-पालटून स्वत: किंवा आपल्या कुटुंबीयांना उमेदवारी देतात. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्याची स्थिती मागासलेली राहिली आहे. हा तालुका माझ्या हातून इतर तालुक्यांसारखा विकसित करायचा आहे,” असे त्यांनी ठासून सांगितले.

शेतकऱ्यांसाठी उभे राहणाऱ्या अनेक उमेदवारांच्या कामगिरीवरही त्यांनी टीका केली. “उत्पादनाच्या योग्य दरांची मागणी असतानाही ऊसाला कमी दर देणारे हेच कारखानदार आता शेतकऱ्यांसाठी लढू म्हणत आहेत. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे हेच आता युवकांसाठी रोजगाराच्या आश्वासनांची पूर्तता करू शकतील का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पाचपुते यांनी स्पष्ट केले की, त्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलगी आहेत आणि त्यांच्याकडे कोणताही राजकीय वारसा नाही. घराणेशाहीला आळा घालण्यासाठीच त्यांनी उमेदवारी केली आहे. “लोकशाहीत घराणेशाहीचा प्रभाव वाढत चालला आहे. मात्र माझी उमेदवारी सामान्य जनतेतून पुढे येत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रचारादरम्यान पाचपुते यांनी स्थानिक जनतेशी गाठीभेटी घेत त्यांच्या मनातील उमेदवार म्हणून विश्वास संपादन केला आहे. “गेल्या चार महिन्यांत प्रत्येक गावात ‘फिक्स उमेदवार – मनातील आमदार’ संकल्पनेद्वारे जनतेमध्ये स्थान निर्माण केले आहे,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, त्यांच्या उमेदवारीमुळे कोणाला फटका बसेल हे त्यांना माहिती नाही, परंतु जनतेसाठीच त्या निवडणुकीत आहेत.

शेवटी, पाचपुते यांनी ठाम विश्वास व्यक्त केला की, या निवडणुकीत घराणेशाहीला तिलांजली देऊन एक पात्र, सक्षम, निर्भीड आणि निपक्ष उमेदवार जनतेतून निवडून येईल. “जनता आता बदलासाठी सज्ज आहे. यावेळी आर्थिक ताकद व घराणेशाहीवर विश्वास न ठेवता, योग्य उमेदवाराला मतदान करतील,” असे त्यांनी सांगितले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading