आ.रोहित पवारांची कुकडी पाण्यासंदर्भातील भूमिका सरळमार्गी.

दिनांक २३ एप्रिल,श्रीगोंदा:

जुन्नर पासून करमाळ्या पर्यंत एकाही शेतकऱ्यावर कुकडीच्या पाण्याच्या बाबतीत अन्याय होऊ नये.ही आपली भूमिका आहे व त्या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे. श्रीगोंदे तालुक्यावरही अन्याय होणार नाही.अशी ग्वाही आ. रोहितदादा पवार यांनी आपल्याला फोनवरून दिल्याची माहिती प्रा. तुकाराम दरेकर यांनी माध्यमांना दिली आहे.

प्रा. दरेकर म्हणाले, श्री. राम शिंदे यांच्या काळात कुकडीच्या पाण्याच्या बाबतीत श्रीगोंदे तालुक्यावर नेहमी अन्याय केला जात होता. म्हणून,श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्जत- जामखेड मतदार संघातील आपापल्या नातेवाईकांशी संपर्क करून,राम शिंदे यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याचा फायदा रोहितदादा पवार यांना निवडणुकीत झालेला आहे. म्हणजे रोहितदादा यांच्या विजयात श्रीगोंदा तालुक्याचा खारीचा वाटा आहे. हे कोणीही नाकारू शकणार नाही. म्हणून, रोहितदादांनी श्रीगोंदे तालुक्यावर अन्याय होणार नाही,याची काळजी घ्यावी.

श्रीगोंदे तालुक्याला १७ एप्रिल पासून २२ एप्रिल २०२० पर्यंत सहा दिवसांत ४५० दशलक्ष घनफूट पाणी मिळालेले आहे. श्रीगोंद्याच्या सिंचनासाठी साधारणत: हजार ते अकराशे दशलक्ष घनफूट पाणी लागते. म्हणजे श्रीगोंदे तालुक्याला आवर्तन पूर्ण होण्यासाठी अजून, किमान ६०० दशलक्ष घनफूट पाण्याची गरज आहे.परंतु, येडगाव धरणामध्ये आज फक्त ५३६ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. लॉसेस वजा जाता त्यातील फक्त ३०० दशलक्ष घनफूट पाणी श्रीगोंदाला मिळू शकते.

आत्तापर्यंत मिळालेले ४५० आणि अजून चार दिवस मिळू शकणारे ३०० असे ७५० दशलक्ष घनफूट पाणी मिळाले तरी श्रीगोंद्याचे सिंचन होण्यासाठी अजून ३०० द.ल.घ.फूट पाण्याची गरज आहे.माणिकडोह धरणातून ५०० दशलक्ष घनफूट पाणी येडगावात सोडले तर लॉसेस वजा जाता श्रीगोंदाला ३०० दशलक्ष घनफूट पाणी मिळणार आहे. म्हणजे येडगाव धरणातील शिल्लक असणाऱ्या ५३६ दशलक्ष घनफूट पाण्यात माणिकडोहचे ५०० दशलक्ष घनफूट पाणी मिळाले तरच श्रीगोंद्याचे सिंचन पूर्ण होऊ शकेल, असेही प्रा.दरेकर म्हणाले.

जलसंपदामंत्री जयंत पाटील , उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि रोहित दादा पवार यांनी लक्ष घालून श्रीगोंद्याचे चालू आवर्तन पूर्ण करावे अशी मागणी प्रा. दरेकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading