दिनांक १९ ऑक्टोबर २०२५, श्रीगोंदा:
दारू पिऊन लहान मुलाला उचलून घेण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे एका ७१ वर्षीय वृद्धाला मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध खुनाचा कलम १०३(१), ३(५) बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे दिपक शीवाजी वाघ (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी क्र. १ राजू विठ्ठल वाघ आणि आरोपी क्र. २ विशाल राजू वाघ (दोघे रा. वाघ वस्ती, काष्टी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२.३० ते १२.५० वाजण्याच्या सुमारास वाघ वस्ती, काष्टी येथे ही घटना घडली. फिर्यादीचे वडील, मयत शिवाजी विठ्ठल वाघ (वय ७१) यांनी आरोपी विशाल वाघ यास ‘तू दारू पिलेला आहेस, त्यामुळे लहान बाळास घेऊ नकोस,’ असे म्हटले. याचा राग आल्याने दोन्ही आरोपींनी त्यांच्या हातातील लाकडी बांबूने शिवाजी वाघ यांना मारहाण केली.

या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शिवाजी वाघ यांना उपचारासाठी ससून हॉस्पिटल, पुणे येथे दाखल करण्यात आले होते. तथापि, उपचारादरम्यान दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ०४.४५ वाजता त्यांचा मृत्यू झाला.

आरोपींनी संगनमत करून मयतास जीवे ठार मारून त्यांचा खून केला असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या घटनेची माहिती पोलीस स्टेशनला १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजता मिळाली आणि त्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक गणेश अहिरे हे करत आहेत.
स्रोत:(अधिकृत माहिती)

Advertise…
