सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे सन 2025– 26 मध्ये गळीतास आलेल्या उसाचे प्रोत्साहन पर अनुदान तसेच कामगारांचा पगार व बोनसची रक्कम सुमारे 11.34 कोटी रुपये बँकेत वर्ग करून सभासद शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाची पूर्तता केली असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नागवडे यांनी म्हटले आहे की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025– 26 या गळीत हंगामात कारखान्याने पाच लाख ८१ हजार ०६० ने टन उसाचे गाळप केले असून सदर ऊस पुरवठादार सभासद व शेतकऱ्यांना रुपये 3000 प्र.मे. टन याप्रमाणे पहिला हप्ता दिलेला आहे. तथापि सभासद शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे 150 रुपये प्र. मे.टन प्रमाणे ऊस विकास प्रोत्साहन अनुदान पेमेंटची रक्कम रुपये 8.72 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे कामगारांचे पगार व बोनसची रक्कम रुपये 2.62 कोटी त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेली आहे. सभासदांना गटवार सवलतीचे दरात साखर वाटप चालू असून येत्या सात तारखेपर्यंत सदर साखर वाटप चालू राहणार आहे . सभासदांनी आपली साखर वेळेत घेऊन जावी असे आवाहन नागवडे यांनी केले आहे.
नागवडे यांनी पुढे म्हटले आहे की, स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांच्या विचारांचा वारसा घेऊन सभासद शेतकरी हिताचा कारभार करत असताना नागवडे कारखाना ऊस भावामध्ये कधीही मागे राहिलेला नाही. त्याचप्रमाणे चालू गळीत हंगामात व भविष्यातही मागे राहणार नाही . सर्वसामान्य शेतकरी व ऊस उत्पादक यांचा स्वाभिमान टिकविण्यासाठी व त्यांना योग्य न्याय मिळणे करिता सहकारी साखर कारखानदारी जिवंत राहणे गरजेचे आहे. चालू गळीत हंगाम जानेवारी २०२७ अखेरपर्यंत चालेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी थोडे थांबून आपला ऊस नागवडे कारखान्यास गळीतास देऊन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. नागवडे सहकारी साखर कारखान्यामुळे सर्वांची प्रगती झाली व जीवनाला उंची मिळाली परंतु आज पुन्हा खाजगीकरणाचा वेढा वाढत चाललेला आहे. त्यामुळे भविष्यकाळात जर शेतकऱ्यांना योग्य न्याय हवा असेल तर सहकारी साखर कारखानदारी जिवंत ठेवण्यासाठी ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन नागवडे यांनी केले आहे.
