श्रीगोंदा, दिनांक १८ ऑक्टोबर :

रात्रंदिवस घनघोर चाललेले कलिंगचे युद्ध एकदाचे थांबले होते. विजयी राजा अशोक युद्धभूमीवर फिरून  आपल्या विजयाचा आढावा घेत होता. राजा अशोक आता केवळ राजाच नव्हता, तर आता तो चक्रवर्ती सम्राट बनला होता.आपल्या वडिल-आजोबांनाही जिंकणे अशक्य असलेला समृद्ध कलिंग आता त्याच्या अधिपत्याखाली आला होता.  सम्राट चंद्रगुप्त मौर्य व त्याचा पुत्र बिंदूसार मौर्याला राजवंशीय न मानता, त्यांच्या व्यापारी जहाजांना लुटून , तसेच कलिंगच्या बंदरातून व्यापारास परवानगी नाकारून मौर्यांचे अर्धशतकाहूनही अधिक काळ प्रचंड आर्थिक नुकसान करणाऱ्या चैत्यराजाचा पूर्णपणे बीमोड करून,मोठ्या गर्वाने, विजेत्याला शोभेल, अशाच बेदरकारपणे तो युद्धभूमीवर फिरत होता. एकटाच…. अंगरक्षकाविना….तशीही त्याला अंगरक्षकाची गरज नव्हती. कारण आता त्या समरभूमीवर होता तो फक्त दोन्हीही पक्षाकडील मृत सैनिकांच्या प्रेतांचा पडलेला खच, जखमी सैनिकांचे जखमा असह्य झाल्यामुळे विव्हळणे, बाणांच्या वर्षावात मेलेले घोडे, भाल्यांनी भोकसलेले हत्ती, मोडलेले रथ व शस्रांसह तुटलेले हात. हे सर्व पाहात पुढे चाललेल्या अशोकाचा रण आवेश हळू हळू ओसरत चालला होता. त्याचे ते चंड रुप आता थंड होत चालले होते. रणांगणात एकमेकांवर आवेशाने तुटून पडलेले ते सैनिक आता मात्र एकमेकांच्या शेजारी चिरनिद्रा घेत पडलेले होते. हे सर्व पाहून अशोकाचे मन द्रवत होते. त्याचा विजयाचा कैफ उतरत होता. आता त्याच्या मनात एक प्रचंड वादळ घोंगावत होते. हळूहळू त्याच्या विचारांत बदल होऊ लागला. तो आता विचार करू लागला की इतकी प्राणहानी करून आपण नेमके काय मिळवले? आपण कोणावर विजय मिळवला?कलिंगच्या या महासंहारक युद्धात दिड लाख सैनिक ठार झाले होते, दिड लाख जखमी, तर एक लाख  सैनिख कैद केले होते,तर युद्धपश्चात रोगराईने देखील तितकीच मनुष्यहानी घडून आली होती .

       या सर्व घटनांमुळे अशोक दिवसेंदिवस उदास होऊ लागला. राज्यकारभारात त्याचे मन रमेना. अशातच एकदिवस न्यग्रोध नावाचा एक बाल भिक्खू भिक्षाटनासाठी त्याच्या राजवाड्यासमोर येऊन उभा राहिला. अशोकाने त्यास आत बोलाविले. त्या बाल भिक्खूच्या चेहऱ्यावरील कमालीची शांतता व कारुण्य पाहून अशोक प्रभावीत झाला, आणि ही शांतता प्राप्त करण्यासाठी काय करावे, असे विचारले. त्या बाल भिक्खूने तथागत बुद्धाचा कल्याणकारी धम्म आचरणात आणल्यास अशा प्रकारची शांतता लाभू शकते, असे सांगितले व आपले गुरु आचार्य भदन्त उपगुप्त या बाबत आपणांस योग्य तो उपदेश करू शकतील, हे ही सांगितले. क्षणाचाही विलंब न लावता अशोक भंते न्यग्रोध यांच्याबरोबर आचार्य भदन्त उपगुप्तांच्या भेटीस निघाला. अशोकारामात वर्षावासासाठी वास्तव्यास असलेल्या आचार्य उपगुप्तांना पंचांग प्रणाम करून तो एका बाजूस बसला. आचार्यांनी उदासिनतेचे कारण विचारल्यावर त्याने सर्व घटनांचा क्रम आचार्यांना सांगितला. आचार्यांनी मोठ्या प्रेमाने त्याचे सांत्वन केले व तथागत बुद्धाच्या सर्व प्राणिमात्रांविषयी कल्याणकारी असलेला धम्माची धम्मदेसना दिली. असेच दिवस जात असता , अशोकातही आता कमालीचा बदल होऊ लागला. त्याचा धम्माप्रती झुकाव दिवसेंदिवस वाढू लागला. अशोक आता बुद्धास व बुद्धाच्या धम्मास  पूर्णतया शरण गेला . दरबारातही आता धम्मचर्चाच घडू लागल्या. आचार्य उपगुप्तांच्या सानिध्यात राहून अशोकाने तथागताचा धम्म पूर्णपणे आत्मसात केला. तो आता धम्माशोक म्हणून ओळखला जाऊ लागला. आणि आजच्याच दिवशी,इ. स.पूर्व २६१ या वर्षाच्या अशोक विजया दशमीच्या मंगल दिनी तथागतांच्या चरणावर कायमचा शस्त्रत्याग करून, अंगावर काषाय वस्त्राचे चीवर परिधान करून धम्मविजय प्राप्त केला.व तथागताच्या धम्माचे दुसरे धम्मचक्र अनुवर्तन केले. याच ऐतिहासिक दिनाच्या २२००व्या वर्षाचे महत्व जाणून, व तथागत बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या २५०० व्या वर्षी प. पू. बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह तथागत बुद्धांचा आदि कल्याणकारी, मध्य कल्याणकारी व अंत ही कल्याणकारी असणाऱ्या धम्माचा मोठ्या श्रद्धेने स्वीकार करून तिसरे व जगातील सर्वात मोठे धम्मचक्र अनुवर्तन करून धम्मचक्रास गतिमानता प्राप्त करून दिली.

बांधवांनो…….आपणांस अशोक विजया दशमी व धम्मचक्र अनुवर्तन दिनाच्या खूप खूप हार्दिक मंगल कामना…….!!! 

नमो बुद्धाय……! जय अशोक……!! जय भीम…….!!!

लेखक :अशोक नगरे ,पारनेर,अहमदनगर…

Leave a Reply