११ जुलै २०२६, श्रीगोंदा /बारामती :
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवैध हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत अंतर्गत बारामती परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूस जप्त केले आहे. अटक करण्यात आलेला आरोपी श्रीगोंदा तालुक्यातील रहिवासी आहे.
गुरुवारी (दि. ९ जुलै) स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बारामती परिसरात पेट्रोलिंग करत असताना, रुई पाटीजवळ एक तरुण कमरेला अवैध पिस्तुल लावून उभा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस पथकाने पंचांसह तातडीने धाड टाकली.
यावेळी पोलिसांनी श्रीगोंद्याच्या भानगाव येथील ओम उर्फ लाला राजेंद्र कुदांडे याला कडक बंदोबस्तात ताब्यात घेतले. पोलिसांंनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे १ अवैध गावठी पिस्तुल आणि १ जिवंत काडतूस मिळून आले. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जागीच जप्त केला आहे.
या प्रकरणी आरोपी ओम कुदांडे याच्याविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
स्रोत :(ऑनलाईन वृत्त)
