दिनांक २२ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:
मिळालेल्या माहितीनुसार मेफेड्रोनच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत आवश्यक बाबींसाठी आरोपींना कोणी पैसे पुरवले.? त्याचबरोबर मेफेड्रोनच्या विक्रीतून आलेल्या पैशाचे नमूद आरोपींनी काय केले.? याबाबत पुढील तपास पोलिस करीत आहेत.
सविस्तर असे की, औद्योगिक वसाहत कुरकुंभ येथील अर्थ केम लॅबेरोटरीत तयार झालेले मेफेड्रोन या गुन्ह्यातील आरोपी हैदर शेखच्या माध्यमातून वितरित होते. विश्रांतवाडीतील मिठाच्या गोदामात ठेवलेले आणि अर्थ केममध्ये तयार होत असलेले मेफेड्रोन शेखच्या माहितीनुसार जप्त करण्यात आले.
सदरील गुन्ह्यात आत्तापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (वय ४०, रा. सोमवार पेठ, खडीचे मैदान), अजय अमरनाथ करोसिया (वय ३४, रा. भवानी पेठ) हैदर नूर शेख (वय ४०, रा. विश्रांतवाडी), भीमाजी परशुराम साबळे (वय ४६, रा. पिंपळे सौदागर, मूळ श्रीगोंदा), युवराज बब्रुवान भुजबळ (वय ४१, रा. मरिबाचा वाडा, डोंबिवली) आणि आयुब अकबरशाहा मकानदार (वय ४८, रा. कुपवाड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मकानदार याला गुरुवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली आहे. विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि कुपवड येथे केलेल्या कारवार्इत पुणे पोलिसांनी आत्तापर्यंत ८६७ किलो ५४७ ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन जप्त केले आहे. त्याची किंमत एक हजार ६३९ कोटी १८ लाख २८ हजार ९०० रुपये आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
