श्रीगोंद्यातील सात दिवसांच्या लॉक डाऊनला ‘संभाजी ब्रिगेड’ सह ‘बहुजन व्यापारी संघटने’चा विरोध.. शासकीय निकषांचे उल्लंघन केल्यास ? कारवाई: पोलीस निरीक्षक जाधव..

दिनांक १२ सप्टेंबर,श्रीगोंदा:

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, श्रीगोंदा शहरासह तालुक्‍यात काही दिवसांचा जनता कर्फ्यू किंवा लॉकडाऊन असणे गरजेचे असल्याचे अनेकांचे मत समोर येत होते. त्या अनुषंगाने तालुका व्यापारी असोसिएशन व स्थानिक आमदार, पुढारी, नेते व सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने श्रीगोंदा शहरासह तालुक्यात लॉकडाऊन करण्यासंदर्भात आज दिनांक १२ सप्टेंबर रोजी सकाळी श्रीगोंद्याचे तहसिलदार यांचे दालनात बैठक संपन्न झाली. यात सर्वानुमते चर्चा होऊन दिनांक १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान लॉकडाऊन करण्याचे ठरले.

मात्र, हा लॉकडाऊन सामान्य व्यापारी, संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांना विचारात न घेता करण्यात आल्याचे मत काहींनी मांडले. स्थानिक प्रशासनाला संध्याकाळी उशिरा निवेदन देत नमूद लॉकडाऊनला विरोध दर्शवण्यात आला आहे. तालुक्यातील संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते व श्रीगोंदा तालुका बहुजन व्यापारी संघटनेच्या माध्यमांतून सकाळी ठरलेल्या जनता कर्फ्युला विरोध दर्शवण्यात आला. यासाठी शहरातील व्यावसायिक व छोटे-मोठे दुकानदार निवेदन देण्यासाठी उपस्थित राहिले. यानंतर पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस व सतीश बोरुडे उपस्थित होते. यावेळी त्यांनी लॉकडाऊन संदर्भातील त्यांची भूमिका नमूद केली.

यावर पोलीस निरीक्षक जाधव यांनी तालुक्यात अनेक दिवसांपासून लॉकडाऊन संदर्भात सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी सह छोटे-मोठे व्यापारी व सामान्य लोकांच्या सूचना येत होत्या. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचे त्यांचे मत होते. त्यानुसार व्यापारी असोसिएशन श्रीगोंदा तसेच आमदार बबनराव पाचपुते व त्यांचे सर्व पदाधिकारी काही सामाजिक संघटना व त्यांचे पदाधिकारी असे मिळून, सकाळी तहसील कार्यालयात जनता कर्फ्यु संदर्भात बैठक संपन्न झाली. त्यात सर्वानुमते लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात कोणतेही राजकारण नसून स्वयंस्फूर्तीने श्रीगोंदा तालुक्यातील लोकांनी घेतलेला हा निर्णय असल्याचे जाधव यांनी नमूद केले. स्थानिक प्रशासनाचा सदरील विषयात कोणताही तात्विक संबंध नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जर शासनाने निर्देशित केलेल्या वेळे पेक्षा जास्त कालखंड किंवा निकष आणि अटींचे जर कोणी उल्लंघन केले ? तर, त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असेही त्यांनी येथे सांगितले आहे.

शासनाने दिलेल्या नियम व अटींचे पालन करून सकाळी नऊ ते सायंकाळी सात या नियोजित वेळेत, दुकान चालक व ग्राहक यामध्ये सामाजिक अंतर ठेवून, कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घेत, गर्दी न करता, दुकान किंवा व्यवसाय चालू ठेवता येणार असल्याचे समजते आहे. शासकीय नियम व अटींचे उल्लंघन केल्यास, स्थानिक प्रशासनाकडून कारवाईचे संकेत दिसत आहेत.

स्रोत:(मिळालेले निवेदन व अधिकृत माहीतीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading