दिनांक २४ डिसेंबर,श्रीगोंदा:
पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. पत्रकारांमूळे समाजातील गोरगरीब, वंचित नागरिकांना न्याय मिळतो व पत्रकार हा सत्ताधाऱ्यांना योग्य दिशेने वाटचाल करण्यास भाग पाडतो. त्याच पत्रकारांना मात्र राजकीय, प्रशासकीय सवलतींपासून दूर रहावे लागते. तालुका पातळीवर पत्रकारांना अधिस्वीकृती, शासकीय जाचक अटी व राजकीय अनास्थेमुळे अनेक सोयी सवलतींपासून वंचित राहावे लागत आहे.
पत्रकारांना पत्रकार भवन, वसाहत, मुलांचे शिक्षण, बस, रेल्वे, रस्ता टोल फ्री, पेन्शन या मूलभूत प्रश्नांवर शासन व राजकीय लक्ष वेधण्यासाठी नव्यानेच स्थापन झालेल्या श्रीगोंदा प्रेस क्लब संघटनेच्या वतीने श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर सोमवार दिनांक ३ जानेवारी रोजी प्रतिकात्मक धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रेस क्लबचे अध्यक्ष विशाल चव्हाण व सचिव मीरा शिंदे यांनी दिली.
याबाबतचे निवेदन श्रीगोंदा पोलीस निरीक्षक व तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी चव्हाण म्हणाले की, पत्रकार भवनाबाबत श्रीगोंदयातील राजकारण्यांनी गेल्या १० वर्षांपासून मौन पाळले आहे. पत्रकारांनी अनेक राजकिय नेते घडवले, सामाजिक कार्यकर्त्यांना बळ दिले, उपेक्षित घटकांना न्याय दिला. पण राजकीय, प्रशासकीय यंत्रणेने पत्रकार भवनाबाबत कोणतीही ठोस भूमिका न घेता, दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा फक्त हारतुरे देऊन बोळवण केली..! हा प्रश्न लवकरात लवकर प्राधान्याने सोडवून, तालुक्यातील सर्व पत्रकारांसाठी पत्रकार भवन, वसाहत व इतर प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी पत्रकार बंधू धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत.
या धरणे आंदोलनात तालुक्यातील सर्व पत्रकारांनी सहभागी होण्याचे आवाहन श्रीगोंदा प्रेस क्लबच्या वतीने करण्यात आले आहे. याचबरोबर दिनांक ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून बुधवार दिनांक ५ जानेवारी रोजी शहरातील तुळशीदास मंगल कार्यालय याठिकाणी सकाळी ११ वाजता श्रीगोंदा शहर व तालुक्यातील दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना साडी-चोळी, सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्य-कर्तृत्वाचा, सन्मान करण्यात येणार आहे.
यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील भूमिपुत्र असलेले राज्यात महसूल, पोलीस, विविध शासकीय सेवेत उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा, तसेच, आदर्श उद्योजक, शिक्षक, आदर्श शेतकरी यांचा प्रेस क्लबच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी प्रेस क्लब (उपाध्यक्ष) विजय उंडे, (कार्याध्यक्ष) मुश्ताक पठाण, (संघटक) सुहास कुलकर्णी, (प्रवक्ते) राजेंद्र राऊत, मेजर भीमराव उल्हारे, आप्पा चव्हाण आदी सदस्य उपस्थित होते.
श्रीगोंदा प्रेस क्लबच्या वतीने धरणे आंदोलनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन..
स्पर्धा परीक्षेची, पोलीस, सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आलेला असून, उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले व कर्जत पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव हे मार्गदर्शन करणार आहेत.
स्रोत:(प्रसिद्धीस दिलेली माहिती)
