यशोगाथा..
दिनांक २९ एप्रिल,अहमदनगर:
वर्षानुवर्षे गुन्हेगारी जमात म्हणून समाजाकडून हिणविल्या जाणाऱ्या पारधी समाजातील श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील शरद काळे या तरुण शेतकऱ्याने आधुनिक शेतीची कास धरून प्रगतिशील शेतकरी होण्यापर्यंतची यशस्वी वाटचाल केली आहे. आणि आपल्या जमातीवर लागलेला गुन्हेगारीचा हा कलंक पुसून टाकून श्रीगोंदा तालुक्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे आदिवासी पारधी समाजाची १५-२० घरे आहेत. त्यातील बहुतांशी लोक शेती करतात. त्यातीलच सोपाना गवंड्या काळे या आजोबापासून, बाटक्या सोपाना काळे आणि आता शरद बाटक्या काळे या पारधी समाजातील तिसऱ्या पिढीने वडिलोपार्जित शेती व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वी द्राक्ष बागायतदार बनण्याचा प्रवास केला. कांदा, बटाटा, डाळिंब, खरबूज, टरबूज या पिकानंतर द्राक्ष शेतीकडे त्याने आपला मोर्चा वळविला आहे.
शरद काळे यांच्याकडे स्वतःच्या मालकीची ९ एकर वडिलोपार्जित शेती आहे. गावातील खंडू हिरवे या प्रगतशील शेतकऱ्याच्या मार्गदर्शनाखाली त्याने आपल्या ९ एकर शेतीमध्ये सध्या गहू, भुईमूग, कांदा ही पिके घेतली. त्याच बरोबर शेतीला जोडधंदा म्हणून काही दिवस म्हैस व गाय पालन करून दूध व्यवसाय देखील केलाय. आपले आई वडील, भाऊ, भावजई, पत्नी व मुलगा त्याच बरोबर ६ ते ७ मजुरांच्या साहाय्याने तो पूर्णवेळ शेतीकाम करतो. द्राक्ष बागासाठी लागणारे शेणखत व गोमुत्रासाठी त्याने ४ गावरान गाई व २ जर्सी गायाही सांभाळल्या आहेत.
फक्त ६ वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या शरद काळे याने पारगाव, घारगाव, घोटवी, बेलवंडी या गावातील आधुनिक शेतीचा आदर्श घेतला. आणि शेतामध्ये सहकुटुंब कष्ट केले. त्यामुळे यंदा आपल्या २ एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागामधून १० ते ११ टन द्राक्षाचे पीक घेतले. आणि जिल्ह्यात लॉक डाऊन सुरू होण्यापूर्वीच म्हणजे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्याने आपली द्राक्षे पंजाब, हरियाणा येथे पाठविली. सध्या शेतातील कांदा काढण्याचे काम सुरू आहे. तर गहू काढून झाला आहे. उन्हाळी भुईमुगाचे पीक यायला अजून अवकाश आहे.
आपल्या शेतातच सहकुटुंब वस्ती करून राहत असल्यामुळे शेतात पूर्णवेळ काम करता येते. दिवसातून ८ ते १२ तास काळे कुटुंबीय शेतात राबते. शेतीची कामे सुखकर होण्यासाठी शेतीतून मिळालेल्या उत्पन्नातून त्याने ट्रॅक्टरसह शेतीसाठी लागणारी सर्व अत्याधुनिक अवजारेही स्वतः खरेदी केली आहेत. प्रामाणिकपणे कष्ट केले तर, शेतीतून चांगले उत्पन्न मिळते आणि आपला विकास होऊ शकतो. हे त्याने आपल्या शेती कामातून सिद्ध केले आहे.
पारधी समाजातील बेरोजगार तरुणांनीही शेती करावी, ज्यांना स्वतःची शेती नाही, त्यांनी शेतीतील विविध कामे शिकून घ्यावीत आणि आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यावे.असे त्याचे म्हणणे आहे. कारण श्रीगोंदा तालुक्यातील द्राक्ष शेतीसाठी चांगले कुशल मजूर मिळत नाहीत. नाशिक, सांगली, सातारा येथून दरवर्षी द्राक्ष कामासाठी मजूर येतात. या मजुरांना पुरुषांना ५०० रुपये तर महिलांना ३०० रुपये रोजंदारी मिळते. त्यामुळे पारधी समाजातील बेरोजगार तरुणांनी जर द्राक्ष शेतीतील कटिंग, बांधणी, खत भरणे, माती लावणे, काडी धरणे, औषधांची फवारणी करणे ही कामे शिकून घेतली.तर, पती-पत्नींना दररोज ८०० ते १००० रुपये रोजंदारी मिळू शकते व त्यातून आपला व आपल्या कुटुंबाचा चांगला उदरनिर्वाह होऊ शकतो.
शरद चे आई वडील अशिक्षित आहेत. भाऊ अविनाश बाटक्या काळे ७ वी पर्यंत शिकला आहे. तर स्वतः फक्त ६ वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. शिक्षण कमी असल्यामुळे शेती मालाची निर्यात करणे, बँकेत कर्ज प्रकरण करणे, बाहेरच्या राज्यातील व्यापाऱ्यांशी संवाद साधणे, आपला शेतीमाल इतर राज्यात व देशात एक्स्पोर्ट करणे या कामामध्ये अनेक अडचणी येतात. त्यामुळे कुठल्याही व्यवसायासाठी शिक्षण घेणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणूनच त्याने आपली मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घातली आहेत. शेतीतून मिळालेल्या पैशातून त्याने आपल्या कुटुंबासाठी ४ चाकी आलिशान गाडी देखील घेतली आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून जसा वेळ मिळेल तसा सामाजिक कार्यकर्ते डॉ. अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या ३ तालुक्यात सामाजिक कार्यात देखील त्याचा सहभाग असतो.
(शब्दांकन:भगवान राऊत)
