दिनांक १० ऑक्टोबर २०२५ अहिल्यानगर:
जिल्ह्याच्या विविध पोलिस ठाण्यांत गेल्या अनेक वर्षांपासून दाखल असलेल्या एकूण २० गुन्ह्यांमधील सुमारे ९३४ किलो वजनाचा गांजा काल, विशेष मोहिमेंतर्गत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आला.

रांजणगाव (शिरूर) एमआयडीसी येथील महाराष्ट्र इन्व्हीरो पॉवर लि. या ठिकाणी हा गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया करण्यात आली. या नाश करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील गांजाचा देखील समावेश होता.
https://www.facebook.com/share/17gpKpEy5V/
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी अंमली पदार्थ कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल नष्ट करण्यासंदर्भात ही विशेष मोहिम हाती घेतली होती.

समितीच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील अंमली पदार्थ कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमालाचा आढावा घेऊन, संबंधित तपास अधिकाऱ्यांमार्फत न्यायालयाकडून हा मुद्देमाल नष्ट करण्याची परवानगी मिळवण्यात आली.

जामखेड, तोफखाना, राहुरी, कर्जत, पारनेर, श्रीरामपूर शहर, शेवगाव, मिरजगाव, कोपरगाव तालुका, भिंगार कॅम्प, श्रीगोंदा व राहाता या पोलिस स्टेशनला अंमली पदार्थ कायद्यान्वये दाखल असलेल्या एकूण २० गुन्ह्यांमधील ९३३ किलो ५७० ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा आणि गांजाची झाडे नष्ट करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ, मुंबई यांचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन, महाराष्ट्र इन्व्हीरो पॉवर लि., रांजणगाव, एमआयडीसी, ता. शिरूर (पुणे) या ठिकाणी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा गांजा विशेष मोहिमेअंतर्गत नष्ट करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलिस अंमलदार शामसुंदर गुजर, पंकज व्यवहारे, संतोष खैरे, अतुल लोटके, चंद्रकांत कुसळकर, अर्जुन बडे, जालिंदर माने, जयराम जंगले यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
