श्रीगोंद्यात अवैध धंद्यांना पोलिसांचे पाठबळ.? गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या पोलिसांवर SP अहिल्यानगर यांचा शिस्तभंगाचा आदेश लागू होणार का..?

श्रीगोंदा | २० जून २०२५ | प्रतिनिधी

श्रीगोंदा तालुक्यात अनधिकृत आणि अवैध धंद्यांचे पाळेमुळे दिवसेंदिवस घट्ट होत चालले असून, त्यामागे थेट पोलिस प्रशासनाचा वरदहस्त असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात येत आहे. पोलीस यंत्रणा आणि स्थानिक राजकीय-सामाजिक मंडळी यांच्या सहकार्यामुळेच हे अवैध उद्योग तालुक्यात जोमाने फोफावत असल्याची गंभीर चर्चा सध्या रंगली आहे.

पोलीस अधीक्षक घार्गे (एसपी) अहिल्यानगर यांनी जिल्ह्यातील पोलिसांना वारंवार सूचना करूनही श्रीगोंदा तालुक्यात या बेकायदेशीर व्यवसायांचा उच्चांक नोंदवला जात आहे. जुगार अड्डे, मटका, दारू विक्री, सट्टा, गांजाचे व्यवहार, अवैध वाळू उपसा यासारखे अनेक धंदे खुलेआम सुरू असून, त्यातून दररोज लाखोंची उलाढाल होत आहे. यामध्ये स्थानिक पोलीस स्टेशनचे कर्मचारी सहभागी असल्याचा आरोपही करण्यात आला होता.

विशेष म्हणजे, या सर्व गोष्टींची कल्पना संबंधित बीट मार्शल आणि ठाण्यातील अंमलदारांना असूनही, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. काही ठिकाणी पोलिसांनी अवैध धंदे चालवणाऱ्यांशी थेट हितसंबंध निर्माण केले असून, तक्रार करणाऱ्यांवर उलट दबाव आणला जातो. “तक्रार करेल तो मरेल” अशी गुन्हेगारी वृत्तीची दहशत सर्वत्र पोहोचली आहे.

या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक अहिल्यानगर यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. हे आदेश कधी लागू होणार? आणि हे अवैध उद्योग उघडपणे पोसणाऱ्या कर्मचार्‍यांवर ठोस पावले कधी उचलली जाणार? असा ज्वलंत प्रश्न उपस्थित होत आहे.

  • श्रीगोंद्यात अवैध धंद्यांची वाढती प्रकरणे
  • पोलीस प्रशासनाचे सहकार्य व दुर्लक्ष
  • तक्रार करणाऱ्यांवर गुंडांचा दहशतवादी दबाव
  • बीट अंमलदारांचे कथित हितसंबंध
  • पोलीस अधीक्षकांनी स्वतंत्र चौकशी व शिस्तभंगाचे आदेश द्यावेत..
  • श्रीगोंदा पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक बीटची स्वतंत्र चौकशी.
  • संबंधित अंमलदार व अधिकाऱ्यांवर निलंबन व बदलीसारखी कठोर शिस्तभंग कारवाई.
  • तालुक्यात विशेष तपास पथकाची स्थापना.
  • गुन्हेगारी प्रवृत्तींच्या टोळ्यांवर कडक पावले.

श्रीगोंदा तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा बिघडलेला आलेख पाहता, आता ही बाब जिल्हा व राज्य प्रशासनानेही गांभीर्याने घेतली पाहिजे, अन्यथा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सावटाखाली सामान्य नागरिकांचे जगणे असह्य होईल, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading