तृतीयपंथी कीर्तनकाराचा महापंगतीत सहभाग; रंजीता नाईक ट्रस्टतर्फे वारकऱ्यांना भोजन..

दिनांक २० जुन २०२५,पुणे (प्रतिनिधी):

समाजात अनेकदा उपेक्षित राहणाऱ्या तृतीयपंथीय समुदायाकडून यंदाही एक प्रेरणादायक कार्य घडले. पुण्यातील मंगलमुखी रंजीता नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे सालाबादप्रमाणे याही वर्षी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी महापंगतीचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे, यावेळी महाराष्ट्रातील पहिले तृतीयपंथी कीर्तनकार ह.भ.प. समाधान महाराज नाडकर यांची विशेष उपस्थिती लाभली होती.

तृतीयपंथीय म्हणजे समाजाने अनेक वर्षं उपेक्षित केलेला, चुकीच्या नजरेतून पाहिलेला वर्ग. बालपणापासून समाजाच्या थट्टेचा विषय, कुतुहलाचा भाग ठरलेले हे लोक अनेकदा रेल्वे स्थानकांवर, टोल नाक्यांवर पैसे मागत अस्तित्व टिकवताना दिसतात. पण याच समाजातून काही व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे येऊन आपली ओळख नव्याने निर्माण करत आहेत.

श्रीगोंदा/कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील ह.भ.प. समाधान महाराज नाडकर हे त्याचेच एक बोलके उदाहरण. आळंदीत १४ वर्ष हरिपाठ व कीर्तनाचे शिक्षण घेत, त्यांनी तृतीयपंथीय समुदायातील एक आदर्श निर्माण केला आहे. महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेत तृतीयपंथीय व्यक्तींचे योगदान नव्याने घडत आहे, हे समाधानकारक चित्र आहे.

या महापंगतीत महाराष्ट्रातील विविध भागांतील तृतीयपंथीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रंजीता नाईक ट्रस्ट पुणे यांच्यावतीने समाधान महाराज नाडकर यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी उपस्थितांनी सांगितले की, “तृतीयपंथीय म्हणजे केवळ हिजडे नव्हे, तर समाजाचा अविभाज्य घटक. आज ते कीर्तनकार बनून धर्मप्रसार करतात, महापंगत आयोजित करतात, हे परिवर्तन आपल्याला शिकवणारे आहे.”

सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयानंतर तृतीयपंथीयांना मान्यता व अधिकार मिळत असले तरी समाजिक स्वीकृती मिळवण्यासाठी अजूनही त्यांना संघर्ष करावा लागतो. मात्र समाधान महाराज आणि रंजीता नाईक यांसारखे कार्यकर्ते समाजाच्या मनोवृत्तीमध्ये बदल घडवून आणत आहेत.

स्रोत:(पत्रकार समाधान महाराज नाडकर)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading