दिनांक २० जुन २०२५, श्रीगोंदा:
राजगुरूनगर येथे पार पडलेल्या हिरवाई पर्यावरण समितीच्या राज्यस्तरीय वार्षिक बैठकीत, पर्यावरण रक्षणासाठी सातत्याने कार्य करणारे श्रीगोंदा (अहिल्यानगर) येथील नामवंत सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमी आण्णासाहेब ज्ञानदेव जगताप यांची महाराष्ट्र राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या सदस्यपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

या बैठकीत अध्यक्षस्थानी हिरवाई पर्यावरण समितीचे अध्यक्ष विजयकुमार जेठे होते. तर मार्गदर्शनासाठी ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक पांडुरंग चौघुले (सोलापूर) उपस्थित होते. पर्यावरण विषयक विविध गंभीर मुद्यांवर सखोल चर्चा झाली. राज्यभरात वाढणारे प्रदूषण, स्टोन क्रेशरमुळे होणारा पर्यावरण ऱ्हास, त्याविरोधातील आंदोलन, मोर्चे, प्रशासनाला जाब विचारणे तसेच वृक्षलागवडीसारखे सकारात्मक उपक्रम या विषयावर व्यापक चर्चा करण्यात आली.

विशेषतः आझाद मैदान, मुंबई येथे झालेल्या धरणे आंदोलनाचा आढावा घेत, पुढील न्यायालयीन लढाईबाबत तसेच नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती व राज्यव्यापी जनजागृतीसाठी योजनांची आखणी करण्यात आली. पर्यावरण संवर्धनासाठी धोरणात्मक पावले उचलण्याचे आणि सर्व संबंधित यंत्रणांना जागे करण्याचे ठरवले गेले.

या बैठकीस विविध भागांतून आलेले पर्यावरण कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये प्रमुख उपस्थिती – संजय गायकवाड (नाशिक), शांताराम भोसले (सातारा), माधव सरतापे (छत्रपती संभाजीनगर), संभाजी कापसे (नेवासा), सत्यवान शिंदे (पुणे) यांचा होता.

श्रीगोंद्यातून प्रतिनिधित्व करणारे आण्णासाहेब जगताप यांची राज्यस्तरीय समितीत निवड ही संपूर्ण तालुक्यासाठी गौरवाची बाब आहे. त्यांच्या कार्यशीलतेला मिळालेला हा सन्मान म्हणजे पर्यावरण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची पोचपावती मानली जात आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपनेते साजन भैय्या पाचपुते, महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, जिल्हा शिक्षक बँकेचे माजी चेअरमन अविनाश निंभोरे, माजी चेअरमन बापूराव शिंदे, चेअरमन माधव जगताप सर, बाळासाहेब साळुंके गुरुजी, संजय रायकर सर, रमेश कळमकर, शरद खोमणे, डॉ. उमेश हांडे, डॉ. चंद्रशेखर कळमकर आदी मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
