प्रजापिता सम्राट अशोक (भाग २५).

श्रीनगर असे वसले

अशोकाने काश्मीर जिंकून घेतले तेव्हा तेथील सृष्टीसौंदर्य पाहून खूपच आनंदित झाला. त्या पर्वताच्या उंच उंच राशी व त्यांचे सौंदर्य पाहून डोळे व मन तृप्त झाले. या सृष्टीसौंदर्यातून प्रवास करत असताना अशोकाची मातोश्री सुभद्रांगीदेवीही अशोकाच्या सोबत होती. तेथील सौंदर्य पाहून माता खूपच आनंदी व उत्साहीत झाली. आईला आनंदी पाहून अशोकाला खूपच समाधान वाटले. बर्फाच्या रुपेरी राशींवर पडलेले सोनेरी किरण यामुळे मन मोहून गेले होते. क्षणाक्षणाला बदलणारे रंग मनाला मोहित करत होते. धुक्यात न्हाऊन निघालेली धरती मनाला ओलेचिंब करीत होती.

https://bit.ly/bspmycityshrigonda

हे दृश्य न्याहाळत असताना मातोश्री अशोकाला म्हणाली, ” बाळ, या सुंदर ठिकाणी आपल्यासाठी एखादं गाव का वसवत नाहीस ? उन्हाळ्यात पाटलीपुत्रऐवजी माझ्या नातवांना येथे घेऊन रहायला मला खूप आवडेल. या विशाल वनश्रीमध्ये बांधलेली नगरी आपणास सुखदायक ठरेल. अशोकांनी आईचे बोलणे ऐकल्यावर त्याला जाणवले की माझ्या आईची इच्छा किती साधी आहे. त्यात कोणतीही लालसा नाही की हाव नाही, कोणतीही स्वार्थी महत्त्वाकांक्षा नाही. नातवात रमणारी आजी एक कुटुंबवत्सल अशी प्रेमळ आई .

मी मोठा सम्राट होणार ही गोष्ट ती जाणून होती तरी कधी माझ्या सावत्र आई, भावांबद्दल वाईट बोलली नाही किंवा त्यांच्याविषयी वाईट सांगितले नाही. कोणाबद्दल द्वेष निर्माण केला नाही. एक सद्गुणी, सुशील, प्रेमळ स्त्रीच्या इच्छेत नातवाचे सुख हृदयात साठवत होती आणि या विचारातच अशोकाच्या तोंडून शब्द बाहेर पडले, ” वनश्रीनगर किती योग्य नाव. ” अशोकांनी सेनापतींना आज्ञा केली, “ येथील मंदिराचे काम संपले तरी शिल्पकार, वास्तुतंत्रज्ञ व कारागीर यांना येथेच ठेवा. कमी पडलेल्या लोकांना बोलावून घ्या आणि नवीन गाव वसवण्यात सुरुवात करा . धनाची चिंता करू नका. कितीही खर्च करावा लागला तरी मुक्तहस्ते करण्यात यावा. ही नगरी काश्मीरची राजधानी असेल. “सुभद्रांगीमाता अशोकाला म्हणाली, ” अरे, मी तुला छोटंसं ग्राम म्हटलं होतें. इतकं मोठं द्रव्य खर्च करून राजधानी वसवण्याचा बेत नको करू. ” पण अशोकाने एखादी गोष्ट करायची मनावर घेतली की ती पूर्ण झालीच असे समजा.

मातेच्या इच्छेची करणारा हा महानपुत्र होता. ” राजधानीचे नाव वनश्रीनगर छान आहे की नाही ? या नव्या नगरीला वनश्रीनगर नाव देण्याचे निश्चित करण्यात येत आहे. ” तेव्हा मातोश्री सुभद्रांगी म्हणाली, ” वनश्रीनगर ऐवजी श्रीनगर का ठेवत नाहीस ? ” आईचा आज्ञाधारक अशोक आईचे म्हणणे कसा नाकारेल. त्याने आपल्या आईची आज्ञा मानून खुशीने नाव ठेवले श्रीनगर . आईलाही खूप आनंद झाला. तो शब्दातही व्यक्त करणे शक्य नाही. धन्य ती श्रेष्ठ माता आणि धन्य तिचा श्रेष्ठ पुत्र. याच काळात अशोक आणि असंधिमित्रा यांची भेट झाली. तिने आपल्या नेत्रज्योतीने अशोकाला न्याहाळले व आपल्या हृदयात बंदिवान केले. अशोकांनीही तिला आपल्या श्रेष्ठ राणीचे स्थान दिले. हीच असंधिमित्रा अशोकाची पट्टराणी झाली.

क्रमशः

स्रोत:(श्रीनिवास भालेराव यांच्या प्रजापिता सम्राट अशोक या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading