दिनांक १७ सप्टेंबर(भानगाव/श्रीगोंदा):
तालुक्यातील भानगाव येथे शेतात एका बंद खोलीत रात्री उशिरा जुगार खेळत असलेल्या भानगाव, काष्टी, अहमदनगर, बीड येथील जुगाऱ्यांवर कारवाई करून, रुपये १२००० रकमेसह श्रीगोंदा पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले आहे. जुगार खेळत असणाऱ्यांपैकी पाच जण पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक जण पोलिसांना पाहून फरार झाला आहे.
सविस्तर माहिती अशी की, भानगाव गावातील रामदास साबळे यांच्या शेतातील एका घरामध्ये हार जितचा तिरट नावाचा जुगार चालू असल्याची माहिती स्थानिक प्रशासनास मिळाली. त्या अनुषंगाने येथे जुगार खेळत असलेले नाना बाबुराव गायकवाड काष्टी तालुका श्रीगोंदा, राजेंद्र मारुती ससे सावेडी, अहमदनगर, भारत शिवाजी सोनटक्के चैतन्यनगर, बीड, संतोष ज्ञानदेव तोरडमल, सचिन मच्छिंद्र तोरडमल दोघेही राहणार भानगाव तालुका श्रीगोंदा यांना पोलिसांनी जुगार खेळत असताना पकडले असून, यातील सुरेश पंढरीनाथ गोरे राहणार भानगाव तालुका श्रीगोंदा हा पळून गेला आहे.
या सर्वांवर पोलीस कॉन्स्टेबल संजय बबन काळे यांच्या फिर्यादीवरून मुं. जु. का. क ४, ५, १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून बारा हजार रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सानप पुढील तपास करीत आहेत.
