दिनांक १७ सप्टेंबर,श्रीगोंदा:
श्रीगोंदा कोविड केअर सेंटर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी विनोद पवार हे संशयित कोरोना रुग्णांचे स्त्राव प्रत्यक्ष संपर्कात येऊन तपासून घेत, लोकांना सेवा देत आहेत. या कोरोना संकट युद्धात ते खरे योद्धे ठरत असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
श्रीगोंदा येथील कोविड – १९ केंद्रामधून आतापर्यंत जवळपास हजारो स्त्राव नमुने या वैज्ञानिक अधिकार्याने तपासले आहेत. आज कोरोना पोजिटिव्ह हा शब्द कानी पडताच लोकांना थरकाप सुटतो. एवढी प्रचंड धास्ती या व्हायरसची निर्माण झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा तिरस्कार करणे, एक प्रकारे त्यांना वाळीत टाकणे, अश्या घटना बातम्यांमधून समोर आल्या आहेत. कोरोनामुळे सगे सोयरे दुरावल्याचे सर्व जण बघत आहेत.
मात्र, समाजापुढे एक आदर्श उदाहरण निर्माण करणारे व या कोरोना काळात हजारो लोकांच्या घशातील व नाकातील स्त्राव तपासणारे, आढळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्री. विनोद पवार हे खरे कोरोना योद्धे ठरत आहेत. संशयित व्यक्ती पॉझिटिव्ह की निगेटिव्ह ? हे ठरवण्यासाठी त्या व्यक्तीच्या घशातील व नाकातील स्त्राव तपासला जातो. तेच स्त्राव घेण्याचे कठीण आणि जोखमीचे काम गेल्या काही महिन्यांपासून हा कोरोना योद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडत आहे. त्यांच्या या कार्याबद्दल आढळगाव वासीयांनी कौतुक केले आहे.
त्यामुळे प्रयोगशाळेतील हे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्रीगोंदा नागरिकांसाठी देवदूत ठरत आहेत. या कार्यासाठी त्यांना वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. श्रीकांत शेळके व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. नितीन खामकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
स्रोत:(श्रीकांत ठवाळ यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
