उपरा,लक्ष्मण माने..
या मुक्कामावरून
माझी टिंगल करण्यासाठी जरी कुणी म्हणालं असतं की तू पुस्तक लिही , तर मीच त्याची टिंगल केली असती , इतकी या क्षेत्रात माझी प्रगती ! फारतर, ‘ साधना ‘, ‘ पुरोगामी सत्यशोधक ‘ यांत चार – दोन लेख लिहिलेले. त्या पलीकडे काहीही नाही , आणि आता तर चक्क मी पुस्तक लिहिलं ! माझं मलाच खरं वाटत नाही.
साताऱ्यात आम्ही दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला चालवतो. त्याला श्री. दया पवार आणि प्रा. रावसाहेब कसबे व्याख्याते म्हणून आले होते. त्यांना जात पंचायतीचे काही प्रसंग सांगितले, तेही गप्पा मारताना सहजपणे. ते दोघं, म्हणून म्हणाले. परंतु मला ते धाडस झालं नाही. आपलं हे क्षेत्र नाही इथपासून ते कसं जमणार इथपर्यंत, सारा पाढा वाचून झाला. मी काही लिहू शकलो नाही.
त्यानंतर त्रिपुटीला (जि. सातारा) आम्ही, म्हणजे समाजवादी युवक दलानं दलित व शेतमजूर परिषद घेतली होती. डॉ. अनिल अवचट आले होते. परिषदेनंतर रात्री बऱ्याच गप्पा झाल्या. अर्थात, बोलणारा मी अन् ऐकणारा अनिल. आयुष्यात जे भोगलं, जे सोसलं, ते सारं त्याला सांगत होतो. गप्पा संपल्यानंतर अनिलनं हे सारं लिही असं सांगितलं . पण पुन्हा जुनीच न लिहिण्याची कारणं … अनिलचा प्रचंड आग्रह , मग मी लिहीन म्हणालो .
अनिलनं निवड करण्यासाठी प्रकाशकांची तीन – चार नावं सुचवली. त्यात ‘ ग्रंथाली’चं नाव. ही मंडळी चळवळीतली आहेत, म्हणून यांनाच पुस्तक द्यावं असं मी ठरवलं.
श्री. प्रमोद कोपर्डे यानं हस्तलिखित प्रथमपासून वाचून सतत लिहायला प्रोत्साहन दिलं. तर समाजवादी युवक दलाचे डॉ. नरेंद्र दाभोळकर, पार्थ पोळके, किशोर बेडकिहाळ, दिनकर झिंब्रे यांनी सर्व प्रकारचं सहकार्य केलं. म्हणून तर हा , इथपर्यंत सर्व प्रवास झाला .
पुस्तकासंबंधी काय लिहावं ! जे जगलो, जे भोगलं, अनुभवलं, पाहिलं, ते – ते तसंच लिहीत गेलो. पुन्हा एकदा तेच जगणं जगत गेलो . कुणावर दोषारोप ठेवावा हा हेतू कधीच नव्हता . अनेकदा मोह होऊनही स्वत : ला सावरत गेलो . काही ठिकाणी काही व्यक्तींची नावं बदलली , ती नाइलाज म्हणून . या पलीकडे माझ्या पदरचं काही नाही .
या पुस्तकानं भटक्या – विमुक्त जाती – जमातींच्या प्रश्नांवर सामाजिक मंथन सुरू झालं , भटक्यांचे प्रश्न हा सामाजिक चर्चेचा विषय झाला , आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या मंडळींच्या कामाला चालना मिळाली तर पुस्तक लिहिण्याचे श्रम सार्थकी लागले असं मी समजीन . पिढ्यान्पिढ्या बिहाडं पाठीवर घेऊन गाढवाचं जिणं जगणाऱ्या मंडळींच्या वेदना समाज समजावून घेऊ शकला तरी खूप झालं .
हे लिहिणं हाही जात – पंचायतीच्या दृष्टीनं फार मोठा गुन्हा मी करत आहे . त्याच्या शिक्षेची तरतूद मला माहीत आहे. होणाऱ्या परिणामांना तोंड देण्याची माझी तयारी आहेच.
वडिलांनी एकाच मांडवात दोन्ही छोट्या बहिणींची लग्नं आधी उरकून टाकली आहेत . त्यामुळेच हे लिहिण्याचं धाडस मी करू शकलो असेन काय ? (सातारा, १९/८/८० लक्ष्मण माने)
चेहरामोहरा
‘ उपरा ‘ लिहिण्याअगोदर , कुणी लेखक होशील असं भविष्य सांगितलं असतं तर मीच त्याची थट्टा केली असती असं ‘ उपरा’च्या प्रास्ताविकात मी म्हटलं होतं . आणि ‘ उपरा ‘ ला एवढं अमाप यश येईल हेही कुणी सांगितलं असतं , तर त्याचीही मी थट्टा केली असती . पण ‘ उपरा ‘ लिहिलं ; आणि आयुष्याचा सारा चेहरामोहराच बदलून गेला . एखाद्याला स्वप्नातही खरं वाटणार नाही एवढं उदंड कौतुक मराठी माणसांनी माझं केलं . ज्याच्या वाट्याला काट्याशिवाय काही म्हणजे काहीही आलेलं नाही , अशा मला फुलांच्या हारांनी मढवलं . आपला कुणी साधा सत्कार करील ही कल्पनासुद्धा सामान्य माणसाला मोहरून टाकणारी असते . आपण आणि फुलांचा हार यांचा संबंध कधी काळी येईल हेही न पटणारंच , पण ‘ उपरा’नं लक्ष्मण माने या माणसाच्या बाबतीत अशक्य ते शक्य करून टाकलं . ‘ उपरा ‘ बाजारात आलं आणि अनपेक्षित धक्के बसूलागले . पहिला धक्का बसला तो पत्रांचा . सरकारी कारकुनाचा आणि एखाद्या सामान्य कार्यकर्त्यांचा पत्रव्यवहार किती असतो ? केव्हातरी चुकून माकून आलं एखादं पत्र तर आलं . पण ‘ उपरा’वर जी प्रतिक्रिया आली ती अक्षरश : तुफानी पावसासारखी ; आणि आजही ती चालूच आहे . सुरुवातीला नम्रपणानं पत्रांना उत्तरं देत होतो . पण पत्रं येण्याचा वेग एवढा वाढला की , पत्रांना उत्तरं लिहिणं अशक्य झालं . त्यातच , ‘ उपरा’च्या निमित्तानं व्याख्यानं चालू झाली . मी सारखा बाहेर राहू लागलो . शशी पत्रांना उत्तरं देत असे . पण तिच्याही आटोक्यातलं ते काम नाही असं वाटून शेवटी तीही कंटाळली . परंतु प्रतिक्रियांचा ओघ सतत चालूच ! आज तीन वर्ष संपली तरीही तो चालू आहे . आणि आम्ही दोघेही साधी पोच देऊ शकलो नाही , याबद्दल वाचकांची क्षमा मागितली पाहिजे असं वाटतं .
” प्रतिक्रियांचं स्वरूप साधारणत : भावनिकच होतं . ‘ उपरा ‘ वाचून डोळे पाणावले नाहीत , असा माणूस विरळा . ” ‘ उपरा’नं मुळासकट हादरून गेलो ” , ” ढसाढसा रडलो ” , “ सारं आयुष्य वांझ वाटू लागलं ” , ” उन्मळून पडलो ” , ” ‘ उपरा’नं झोप उडवली ‘ अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया समाजाच्या सर्व थरांतून आल्या . त्याला जात , धर्म , पंथ , लिंग , कशाचीही मर्यादा राहिली नाही . अनेक नामवंतांनी आपापल्या प्रतिक्रिया आवर्जून कळविल्या . समीक्षात्मक लेख तर बेळगाव तरुण भारत ‘ ते नागपूर ‘ तरुण भारत ‘ , सगळीकडे आले. महाराष्ट्रातल्या बहुतेक वर्तमानपत्रांनी, साप्ताहिकांनी, पाक्षिकांनी, मासिकांनी पुस्तकाची नोंद घेतली. अगदी, आकाशवाणी आणि दूरदर्शननंही ‘ उपरा’ची समीक्षा केली. ‘ उपरा’ची अनेक अंगांनी चर्चा झाली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सत्कारांच्या शेकडो सभा झाल्या .
लोकांनी अलोट प्रेम केलं . सातारच्या सभेला एवढा मोठा जनसमुदाय जमला होता की त्याची प्रतिक्रिया दैनिक ‘ सकाळ’चे संपादक मा. श्री. ग. मुणगेकर यांनी जाहीरपणे व्यक्त केली . ती अशी – ” मी आजपर्यंत अनेक सत्कार पाहिलेत , एका साहित्यिकाच्या सत्काराला एवढी प्रचंड गर्दी मी पहिल्यांदाच पाहतोय ! ” पंचवीस – तीस हजार लोक दूरदूरच्या गावांहून आलेले , गाड्या जुंपून . मी माझं कौतुक सांगावं म्हणून किंवा आत्मप्रौढी लिहावी म्हणून हे सांगत नाही . तर , ज्या जनसामान्यांपर्यंत साहित्य गेलं नव्हतं ते आज जात आहे . लातूरची मिरवणूकही अशीच विलक्षण होती . तर , एवढंच सांगावंसं वाटतं , की मराठी माणसांनी ‘ उपरा’ला अक्षरश : डोक्यावर घेतलं . याचं उतराई होणं ही अशक्य गोष्ट आहे . आणि ऋणातून असं मुक्त होण्याची माझी अजिबात इच्छा नाही . मराठी माणसांचं हे प्रेम साऱ्या पारितोषिकांहून मोलाचं वाटतं . लौकिक अर्थानं तसं खूप मिळालं . कुसूर , ता . क – हाड येथील रयत शिक्षण संस्थेच्या मित्रांनी पहिला तात्यासाहेब मुकादम पुरस्कार दिला . या घरच्या पुरस्कारानं सुरुवात झाली आणि पुण्याच्या केसरी 1 – मराठा संस्थेनं तेवढ्याच आपुलकीनं ‘ तात्यासाहेब केळकर पुरस्कार ‘ दिला . केळकर पुरस्कार घेत असतानाच भारती विद्यापीठाच्या आमच्या पतंगराव कदमांनी तिथे लगेच ‘ भारती विद्यापीठ पुरस्कार ‘ जाहीर करून टाकला . अशी पारितोषिकं मिळत असतानाच ‘ फोर्ड फाऊंडेशन’ची तार आली आणि आश्चर्याचा धक्का बसला . तीही दोन लाखाची शिष्यवृत्ती ; आणि अमेरिकेचा फेरफटकाही झाला !
अमेरिकेतही ‘ उपरा’च होतो. तिथल्या जीवनाशी अजिबात समरस होता आलं नाही; अतिशय हाल झाले. तेथील भारतीयांत भेटले तेही पुन्हा उच्चवर्णीय ब्राह्मणच . एकूण चार ब्राह्मण भेटले , त्यातल्या तिघांनी अतिशय चांगलं वागवलं . पुण्याच्या ‘ सकाळ’मध्ये प्रवासवर्णन लिहिताना मी चारांपैकी तिघांबद्दल अतिशय चांगलं लिहिलं . पण एकानं अतिशय वाईट वागवलं . जेवायला बोलवूनही आमच्या (मी व दया पवार)पुस्तकांचे विषय समजल्यानं , पर्यायानं जात समजल्यानं आम्हाला जेवायला दिलं नाही . देशाबाहेर गेलो तरी जातीनं आमची पाठ सोडली नाही , याचं दुःख झालं . वर , ‘ असं झालंच नसेल , तुम्ही खोटं बोलता ‘ ही प्रतिक्रिया ! पण मला अजूनही प्रामाणिकपणे सांगावंसं वाटतं , की खरंच , आम्ही उच्चवर्णीय असतो तर असं घडलं असतं का ? असं वागवलं गेलं असतं का ? पण खरं बोलायची आपल्याकडे सोय नाही . आणि हितसंबंधांसाठी मी खोटं बोलू शकत नाही . तो माझा स्वभावही नाही .
अमेरिकेतून परत आलो . त्याच दिवशी ‘ उपरा’ला ‘ साहित्य अकादमी’चा बहुमान प्राप्त झाला . वयाच्या बत्तिसाव्या वर्षीच ‘ साहित्य अकादमी ‘ मिळाली , याचा मला अभिमान वाटला . भारतीय स्तरावर साहित्य अकादमी’चं पारितोषिक एवढ्या कमी वयात मिळवून मराठी भाषेची मान मी ताठ केली . ‘ साहित्य अकादमी’चा पुरस्कार देत असताना साहित्य अकादमीचे अध्यक्ष श्री . उमाशंकर जोशी म्हणाले , एवढ्या तरुण वयात एवढं चांगलं पुस्तक लिहिलंस याचा अभिमान वाटतो . तर असं थोरामोठ्यांचं प्रेम मिळालं . मान्यता मिळाली . अगदी आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली . आणि अर्थातच , लक्ष्मण माने या माणसाचं भलं झालं . रस्त्याच्या कडेला , गटाराच्या कडेला वाढलेला एक माणूस वर उचलला गेला . हे एका व्यक्तीचं कौतुक खूप झालं .
आणि तरीही मी आज जेवढा अस्वस्थ आहे , बेचैन आहे , तेवढा यापूर्वी कधीच नव्हतो . कारण हा प्रश्न लक्ष्मण माने या एका माणसाचा नाही . तर प्रश्न आहे , असे हजारो लाखो लक्ष्मण माने झोपडपट्ट्यांत , फूटपाथवर , गावकुसाबाहेर आणि ज्यांना गावकूसही नाही ते दऱ्याखोऱ्यांत , रानोमाळात खितपत पडले आहेत . त्यांना ना संधी , ना सोय , ना सवलत , ना आधार , ना आसरा , ना निवारा , ना दोन वेळच्या पोटाची सोय ! असं जग मी पाहतोय , जिथं स्वतःच्या अस्तित्वाची शंका यावी , जिवंतपणाची शंका यावी !! आणि त्यामुळे , दुसऱ्या आवृत्तीला प्रस्तावना लिहावी असंही मला वाटत नाही .
गेलं दीड वर्ष मी फिरतोय. ‘ उपरा ‘ हा माझ्यातल्या उपरेपणाचा शोध होता . आणि ‘ फोर्ड फाऊंडेशन’नं शिष्यवृत्ती दिल्यापासून मी माझ्या समाजाच्या – भटक्या आणि विमुक्त समाजाच्या – उपरेपणाचा शोध घेत वाड्या , वस्त्या , तांडे , जिथे म्हणून जाता येईल , तिथे जात आहे . वस्तीतील आशा – आकांक्षांची मोहोळं मला प्रचंड डसायला लागली आहेत . गेल्या दीड वर्षात असंख्य माणसांशी बोलतोय . ही माणसं बोलू लागली की आतडं पिळवटून निघतं . अनेक जात – पंचायतींना गेलो . तसं माझं हे नवशिक्षण चालू झालंय . आजमितीला सरकारी यादीप्रमाणे भटक्या आणि विमुक्त जमाती बेचाळीस आहेत , आणि माझ्या अभ्यासात आतापर्यंत समाज आणि शासन यांना माहीत नसलेल्या किमान आठ ते दहा नवीन जमाती मला माहितीच्या झाल्या . मलाही तसं माझ्या जातीच्या पलीकडे कुठं काय माहीत होतं ? आणि माझ्या जातीची तरी मला कुठे…
क्रमशः
स्रोत:(लक्ष्मण माने यांच्या उपरा पुस्तकातून )
