श्रीगोंदा, दि. १७ जून २०२५ –
श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या वतीने महाराष्ट्र प्रतिबंधात्मक दंड अधिनियम (MPDA) अंतर्गत स्थानिक गुन्हेगार उमेश शिवाजी वेताळ (रा. लिंपणगाव, ता. श्रीगोंदा) याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्याला नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

उमेश वेताळ याच्यावर गेल्या काही वर्षांपासून गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. यामध्ये शासकीय कामात अडथळा, मारहाण, जबरदस्ती, दहशतीखाली वसुली, गावातील शांतीभंग, आणि जनतेत भीती निर्माण करणारे प्रकार यांचा समावेश आहे. त्याच्या या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते.

श्रीगोंदा पोलीस स्टेशनने संपूर्ण गुन्हेगारी पार्श्वभूमीची कागदपत्रे तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे MPDA अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर उमेश वेताळला तातडीने ताब्यात घेऊन नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले.

यापूर्वी अतिक उर्फ अतिक कुरेशी या गुन्हेगारावरही श्रीगोंदा पोलिसांनी MPDA अंतर्गत कारवाई करून कारागृहात स्थानबद्ध केले होते. त्यामुळे ही सलग दुसरी धडक कारवाई ठरली असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे आणि पोलीस प्रशासनाचा वचक निर्माण झाला आहे.

या कारवाईमुळे लिंपणगाव परिसरात व आजूबाजूच्या गावांमध्ये नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पोलिसांच्या या कडक पावलाचे कौतुक होत आहे.

— स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)
