निर्जन स्थळी तरुणाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न; १५ जणांविरोधात गुन्हा, श्रीगोंदा पोलिसांनी तिघांना केली अटक..

दिनांक १४ जुन २०२५, श्रीगोंदा/पाथर्डी/बेलवंडी/आष्टी:

बाभुळगाव (ता. कर्जत) येथील प्रविण लाला भोसले (वय २९) या तरुणावर १५ जणांच्या टोळक्याने संगनमत करून जीवघेणा हल्ला करून खड्डा करून पुरण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

दि. १९ मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी परिसरात विहिरीच्या कामाच्या पाहणीस गेलेल्या फिर्यादी प्रविण भोसले याला, पूर्वीच्या ओळखीतून, आरोपींनी “तू पोलिसांचा खबऱ्या आहेस” अशी बतावणी करून पेट्रोलपंपाजवळ गाठले. यावेळी मयूर ईश्वर भोसले, अविनाश ऊर्फ विशाल भोसले यांच्यासह अन्य आरोपींनी त्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून, लोखंडी रॉड व तलवारीने डोक्यात, पायावर आणि नाकावर मारहाण केली.

त्यानंतर पिस्तुल दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्याच्या अंगावरील १२ ग्रॅमची सोन्याची अंगठी, पाच तोळ्यांची सोन्याची चैन आणि आयफोन बळजबरीने हिसकावण्यात आले. मारहाणीनंतर त्याला गाडीत बसवून वाकी तिकी (ता. आष्टी), नंतर पाथर्डीच्या माणिकदौंडी डोंगरात आणि शेवटी भिलवडा-जांभळी रोडजवळील डोंगरात नेण्यात आले. तिथे खड्डा खणून “तुला इथेच पुरून टाकतो” अशी धमकी देत पुन्हा अमानुष मारहाण करण्यात आली.

ही अत्याचारमालिका दुसऱ्या दिवशी म्हणजेच २० मे रोजी पहाटे ५.३० वाजेपर्यंत सुरू होती. पोलिसांच्या गाड्या दिसताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.

या प्रकरणी प्रविण भोसले यांच्या फिर्यादीवरून १५ जणांविरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

स्रोत:(फिर्याद)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading