दिनांक १३ जुलै श्रीगोंदा (प्रतिनिधी):
श्रीगोंदा तालुक्यातील सिध्देश्वर मंदीर लिंपणगाव येथे आणि शनी मंदीर श्रीगोंदा येथे दानपेटी फोडण्याच्या गुन्ह्यातील सराईत आरोपीस श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून मंदिर फोडीचे एकूण तीन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

दिनांक ३०/०६/२०२५ रोजी रात्री ८:०० ते ३१/०७/२०२५ रोजी पहाटे दरम्यान सिध्देश्वर मंदीर लिंपणगाव येथे लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरात घुसून दानपेटीतील रक्कम चोरल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पुजारी सौरभ गुरव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. ज्ञानदेव भागवत व पो. कॉ. मनोज साखरे यांनी तपास सुरू केला. दरम्यान, शुभम बबन भापकर (रा. गुंडेगाव, ता. नगर) याने सदर गुन्हा केल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. हा आरोपी वारंवार ठिकाणे बदलत असल्याने त्याचा शोध घेणे कठीण जात होते. मात्र ११ जुलै रोजी घारगाव परिसरातून सापळा रचून त्यास अटक करण्यात आली.

अटक आरोपीने सिध्देश्वर मंदीरातील चोरीची कबुली दिली असून, त्याच्याकडून चोरीस गेलेली रक्कम व गुन्ह्यात वापरण्यात आलेले स्क्रू ड्रायव्हर, हेक्सा पाना, खुरपे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याशिवाय, श्रीगोंदा येथील शनी मंदिरात दानपेटी फोडण्याचा प्रयत्न व गुंडेगाव येथील रामेश्वर मंदिर फोडल्याची कबुली देखील आरोपीने दिली आहे.

आरोपीवर यापूर्वी नगर, रांजणगाव आणि छत्तीसगडमधील बिलासपूर येथे गंभीर गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे. श्रीगोंदा पोलिसांनी उघडकीस आणलेले तीन प्रमुख गुन्हे पुढीलप्रमाणे आहेत:
१) बीएनएस कलम ३३१(४)
२) बीएनएस कलम ६२
३) बीएनएस कलम ३०३(२)
पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी माहिती दिली की, अटक आरोपीने यापूर्वीही अनेक मंदिरांत चोरी केल्याची शक्यता असून नागरिकांनी अशा कोणत्याही घटनेबाबत तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबगर्मे, उपविभागीय अधिकारी गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पोना ज्ञानदेव भागवत, पोकों मनोज साखरे, संदीप राऊत तसेच मोबाईल सेलचे पोकों शिंदे व गुंडु यांनी केली असून तपास सुरू आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
