दिनांक ३१ मार्च,पिंपरी:
बोरिवलीतुन श्रीगोंदा येथे रुग्णाला घरी सोडविण्यासाठी घेऊन जात असताना,उर्से टोलनाक्यावर वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिका चालकाच्या वडीलांना काठीने मारहाण केली. मारहाण झालेल्या व्यक्तीचा काही अंतर पुढे गेल्यानंतर मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २७ मार्च)रोजी दुपारी एकच्या सुमारास उर्से टोलनाक्यावर घडली.
या प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.पुढील तपास गुन्हे शाखा युनिट पाचकडे देण्यात आला आहे.नरेश शिंदे (वय ४९, रा.ठाणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत पुढील तपास करीत आहेत. पो. नि. सावंत यांनी सांगितले की, या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, प्राथमिक अहवालात नरेश यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. डॉक्टरांचा सविस्तर अहवाल येणे बाकी आहे. त्यांनतर पुढील कारवाई केली जाईल.असेही त्यांनी माध्यमांना सांगितले आहे.
(वृत्तसंस्था)
