शिरूरच्या महिला न्यायदंडाधिकारी तहसीलदार लैला शेख यांच्या घराची हेरगिरी व हल्ला करणाऱ्या आठपैकी एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले असुन,इतर सात आरोपी अद्याप फरार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितले आहे.
या हल्ल्यातील वाळूतस्करांच्या चार व्हॉट्सऍप ग्रुपच्या ऍडमिनवरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अशोक सहादु वाखारे(रा. वाखारवाडी,हिंगणी,ता.श्रीगोंदा, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे.तर त्याचे इतर साथीदार अद्याप फरार आहेत.शुक्रवारी (दि. १४)रोजी पहाटे साडेतीन वाजता शेख या कारवाईसाठी जात असताना,त्यांच्या घराची हेरगिरी करून,त्यांना दमदाटी करीत तुम्ही कारवाईला कसे जाता बघतो.तुमच्याकडे,असे म्हणून त्यांच्या पतीवर हल्ला करून पळून जाणाऱ्या वाळू तस्करांच्या मुजोरीमुळे संपूर्ण शिरूर तालुक्यात खळबळ उडाली होती.
हे गुन्हेगार शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांच्यासह प्रांताधिकारी,नायब तहसीलदार खेडचे तहसीलदार यांच्या मोबाइल लोकेशनची हेरगिरी करत होते.अनेक वेळा लैला शेख यांच्या गाडीचा पाठलागही शिरूर,श्रीगोंदा,पारनेर,दौंड, हवेली परिसरातील वाळूमाफिया करीत होते.यासंदर्भात शिक्रापूर, रांजणगाव,शिरूर पोलिसांना याबाबत तहसीलदार यांनी कळविले होते.परंतु,यावर कारवाई न झाल्याने त्यांच्या घरावर आठ वाळू तस्करांनी हल्ला केला होता.
तहसीलदार लैला शेख यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद देताच,वाळू तस्कर गायब झाले होते.सोमवारी (दि. १७)रोजी रात्री उशिरा पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश जगदाळे व पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र मांडगे यांनी यातील अशोक वाखारेचा माग काढून त्याला पकडले.त्यामुळे तहसीलदार शेख यांच्यावर हल्ला करणारे आरोपी लवकरच ताब्यात येतील असे पोलिसांनी माध्यमांना सांगितले.