दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ श्रीगोंदा:
आज दुपारी तालुक्यात वडाळी आणि श्रीगोंदा शहराच्या हद्दीत असलेल्या पठाण बुवा तळ्याच्या प्रवाहात एका मध्यमवयीन महिलेचा कुजलेला मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

रस्त्यावरून जाणाऱ्या एका पादचारी व्यक्तीने तलावाच्या पुलावर तीव्र वास येत असल्याने पाहणी केली. त्यावेळी पाण्यात पाठमोरा तरंगणारा महिलेचा मृतदेह त्यांच्या निदर्शनास आला.

पादचारी व्यक्तीने तत्काळ स्थानिक प्रशासनाला या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे यांच्यासह पोलीस आणि प्रशासकीय कर्मचारी घटनास्थळी हजर झाले.

कर्मचाऱ्यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह तलावाच्या पाण्याबाहेर काढला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने तो नेमका कोणाचा आहे आणि मृत्यूचे कारण काय.? याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण श्रीगोंदा परिसरात तणावाचे वातावरण असून, लोकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
स्रोत:(अधिकृत माहिती)

