श्रीगोंदा शहर कायदा – सुव्यवस्थेच्या उंबरठ्यावर .! पो. नि. किरण शिंदेंच्या कारभारावर प्रश्नचिन्ह..

श्रीगोंदा, दि. ३० जुलै २०२५ (प्रतिनिधी):

श्रीगोंदा शहरातील अतिवर्दळीच्या शनी चौक – बगाडे कॉर्नर परिसरात काल (दि. २९ जुलै) दुपारी १:०० वाजण्याच्या सुमारास दोन तरुणांवर भरदिवसा दहशतीने हल्ला करत जबर मारहाण करण्यात आली. गॅस एजन्सीसमोर उघड्या रस्त्यावर १० ते १५ जणांच्या जमावाने दोघा तरुणांना पकडून बेदम मारहाण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार या घटनेत काही महिला देखील सहभागी होत्या. हल्लेखोरांनी मारहाणीच्या वेळी अश्लील आणि अरेरावीची भाषा वापरत, दोघांना जबर मारहाण केली. प्रसंग पाहून मदतीसाठी धावलेल्या नागरिकांनाही दमबाजीचा सामना करावा लागला.

या प्रकारामुळे पुन्हा एकदा श्रीगोंद्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेषतः श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण शिंदे यांच्यावर स्थानिक गुन्हेगारीवर आणि अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहेत.

शहरात खुलेआम होणारे दंगे, वाढती दादागिरी, टवाळखोरी, कॉलेज परिसरातून वेगाने धावणाऱ्या गाड्या आणि त्यातून होणारी महिला विद्यार्थिनींची छेडछाड – या सर्व प्रकारांबाबत वारंवार तक्रारी करूनही पोलीस प्रशासन कारवाईस टाळाटाळ करत असल्याचा आरोप आहे.

तसेच तालुक्यातील घरफोडी, चोरी, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार, तसेच मागासवर्गीयांवरील अन्याय व गुन्ह्यांचेही प्रमाण वाढत आहे. या गुन्ह्यांमध्ये.. गुन्हे दाखल होतात मात्र, पुढील तपास व कार्यवाही फारशी नजरेस न पडल्यामुळे लोकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

शहरातील वाढती गुन्हेगारी, आणि पोलिस यंत्रणेचे डळमळीत नियंत्रण हे एक गंभीर आणि चिंताजनक वास्तव बनले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी या गुन्हेगारी प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. नागरिकांमध्ये वाढती असुरक्षितता आणि प्रशासनावरील विश्वास कमी होणे, ही प्रशासनासाठी एक चेतावणीच आहे.

जाहिरात..

तपासाचा विषय की पोलीस निरीक्षक शिंदेंच्या दुर्लक्षाचा परिणाम?
आता या प्रकरणात दोषींवर कारवाई होते की पुन्हा एखाद्या घटनेची वाट पाहिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply