श्रीगोंदा नगरपरिषद स्वच्छतेबाबत उदासीन.! बायपास रोड परिसरात कचरा व घाणीचा विळखा — संभाजी ब्रिगेडचा इशारा..

दिनांक २८ जुलै २०२५,श्रीगोंदा (प्रतिनिधी):

श्रीगोंदा नगरपरिषदेच्या हद्दीतील बायपास रोड परिसर सध्या कचऱ्याच्या व घाणीच्या साम्राज्यात अडकला असून, नगरपरिषद प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

या प्रकारामुळे परिसरातील नागरिक, दुकानदार, व रहदारी करणारे सर्वजण त्रस्त झाले असून, दुर्गंधी, माशा, डास, आणि मोकाट कुत्र्यांमुळे संक्रामक आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

दुकानदार आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही नगरपरिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असून, त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड पक्षाने या प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा पोलखोल करत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

संभाजी ब्रिगेडने स्पष्टपणे म्हटले आहे की,

  • जर लवकरात लवकर बायपास रोड परिसरातील संपूर्ण कचरा उचलण्यात आला नाही,
  • व परिसराची निर्जंतुकीकरण मोहीम तातडीने राबवली गेली नाही,
  • तसेच नियमित स्वच्छतेसाठी कार्यपद्धती निश्चित केली गेली नाही,

तर संभाजी ब्रिगेड श्रीगोंदा नगरपरिषद कार्यालयासमोर प्रतीकात्मक “कचराफेक आंदोलन” छेडणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जाब विचारला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

शहरातील नागरी सुविधा आणि स्वच्छतेबाबत अशा प्रकारची उदासीनता गंभीर असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या प्रशासकीय मनमानीविरोधात आता आवाज उठविण्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया विविध संघटनांमधून व्यक्त होत आहे.

दरम्यान, नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ कारवाई केली नाही, तर याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading