दिनांक २८ जुलै २०२५,श्रीगोंदा (प्रतिनिधी):
श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी आणि हिरडगाव या दोन गावांमध्ये चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे ३ लाख ७९ हजार २०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही गुन्ह्यांमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस तपास सुरु आहे.

२७ जुलै २०२५ रोजी पहाटे ३.०० ते ३.३० वाजण्याच्या सुमारास वांगदरी (ता. श्रीगोंदा) येथील साहेबराव विठोबा महारणूर (वय ५८) यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्याने किचनच्या दरवाजाची कडी तोडून प्रवेश केला. घरातील बेडरूममध्ये झोपलेल्या त्यांच्या आत्याच्या गळ्यातील दागिने आणि लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १,७५,०००/- रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

तसेच २८ जुलैच्या मध्यरात्री १२.१० वाजण्याच्या सुमारास सचिन हिरामन भुजबळ (वय ३५, रा. भुजबळवस्ती, हिरडगाव) यांच्या बंद घराचा दरवाजा अज्ञात चोरट्याने उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर २,०४,२००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या दोन्ही गुन्ह्यांमध्ये पोलीस निरीक्षक किरण शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम, पोसई सचिन लिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

गावात सलग दोन घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासनाने चोरट्यांचा शोध घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)
