📅 दिनांक : २८ जुलै २०२५ | प्रतिनिधी : श्रीगोंदा
श्रीगोंदा तालुक्यात मागासवर्गीय व आदिवासी समाजावरील वाढत चाललेले अन्याय व अत्याचार हे गंभीर चिंतेचे विषय ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते वसंतराव सकट यांच्या पुढाकाराने नुकतीच एक सर्वसमावेशक सामाजिक बैठक घेण्यात आली. बहुजन समता पार्टीच्या श्रीगोंदा येथील प्रदेश कार्यालयात ही बैठक पार पडली.

या बैठकीत तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच समाजहितासाठी काम करणारे अनेक जण सहभागी झाले होते. मात्र, बैठकीचे नियोजित उद्दिष्ट आणि स्वरूप अचानक बदलल्याने काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत बैठकीतून बहिर्गमन केले.

बैठकीदरम्यान पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर काही सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. घटना व आरोप यामधील सत्यता आणि विशिष्ट उद्देशामुळे चर्चेचा मूळ गाभा भरकटल्याचा आरोप करत काही सदस्यांनी आपली असहमती नोंदवली.

या पार्श्वभूमीवर ॲड. प्रेरणा धेंडे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. त्या म्हणाल्या,
“मी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या पारनेर/श्रीगोंदा तालुक्यातील शासन समितीची सदस्य असून, समाजातील पीडितांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचा आढावा घेण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र, माझा या बैठकीच्या आयोजनाशी थेट काहीही संबंध नाही. कोणीही या गोष्टीचा विपर्यास करून गैरसमज निर्माण करू नये.“

त्या पुढे म्हणाल्या की, “सामाजिक न्यायाच्या लढ्याला दिशा मिळावी, म्हणून मी पीडितांची भेट घेतली. वाढत्या अत्याचाराच्या घटनांचा आढावा घेणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट होते.“

स्रोत:(अधिकृत माहिती)
