श्रीगोंदा, दिनांक १ ऑगस्ट २०२५:
मुंढेकरवाडी (लिंपणगाव), ता. श्रीगोंदा येथे घडलेल्या खून प्रकरणाचा तपास करून आरोपींना जेरबंद करणाऱ्या श्रीगोंदा पोलिसांचा विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे (नाशिक परिक्षेत्र) यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पोलिसांचे हे धाडस व सतर्क तपासकार्य सन्माननीय ठरले असून पोलिस अधीक्षक कार्यालय, अहिल्यानगर येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

दिनांक २९ मे २०२४ रोजी लिंपणगाव येथील एक महिला बेपत्ता झाल्याची नोंद मिसिंग अन्वये श्रीगोंदा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. सदर प्रकरणाचा तपास पोलीस नाईक ज्ञानदेव भागवत व पोलीस कॉन्स्टेबल मनोज साखरे हे करीत होते. तपासादरम्यान महिलेच्या नातेवाईकांनी तिला राजेंद्र जगन्नाथ देशमुख नावाच्या व्यक्तीसोबत गेल्याचा संशय व्यक्त केला होता.

पोलिसांनी तत्काळ संशयित आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. कसून चौकशीत आरोपींनी खळबळजनक कबुली दिली – जमिनीच्या व्यवहारातून आणि प्रेमसंबंधाच्या वादातून त्यांनी महिलेचा गळा आवळून खून केला व तिचे हातपाय बांधून मृतदेह साताऱ्याजवळील कालव्यात फेकून दिला. यासंदर्भात सातारा पोलीस स्टेशनमध्ये आधीच भा.दं.वि. कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंदवलेला असल्याने आरोपींना कोरेगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

या उत्कृष्ट तपास कार्याबद्दल पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख (त्यावेळचे) यांनी पोना भागवत व पोकॉ साखरे यांना प्रत्येकी ₹२५,००० रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र जाहीर केले होते. या कामगिरीचे कौतुक करताना विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांच्या हस्ते नुकताच औपचारिक गौरव करण्यात आला.

या प्रसंगी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, सपोनि प्रभाकर निकम, पो.उनि. सचिन लिमकर, संपत कन्हेरे, संजय वाघमारे, नंदकुमार भैलुमे व अन्य सहकारी अंमलदार उपस्थित होते. त्यांनी सुद्धा दोन्ही कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

यापूर्वीही मंदीर चोरी प्रकरणात उल्लेखनीय तपास करणाऱ्या याच पोलिसांचा ग्रामपंचायत लिंपणगाव येथे सन्मान करण्यात आला होता. अशा कर्मचाऱ्यांमुळे पोलीस दलाची प्रतिमा अधिक बळकट होत आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
