दिनांक २९ मार्च,पुणे:
संपूर्ण देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे हातावर पोटं असणाऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत.अशा परिस्थितीत अनेक सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत.अश्याच प्रकारे पुण्यातील सामान्य वंचितांची भूक भागविण्यासाठी कामानिमित्त पुण्यात असलेल्या श्रीगोंदेकरांनी अन्नदान करून आपल्या सामाजिक भावना व्यक्त केल्या आहेत.
कोरोनामुळे उदभवलेल्या कठीण परिस्थितीत पुण्यातील स्वारगेट,सारसबाग परिसरातील मजूर,सिग्नलवर खेळण्याच्या विविध वस्तू विकणाऱ्या महिला,लहान मुले,फुगे विकणारे आबालवृद्ध लोकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ही सर्व रस्त्यावर राहणारी गरीब लोक अन्न पाणी अभावी संभ्रमित झालेली असतांना.श्रीगोंदा तालुका येथील पुण्यात नोकरीनिमित्त असणारे युवक प्रेमकुमार गलांडे यांनी हे सर्व दृश्य पाहिले. त्यांनी या सर्व लोकांची विचारपूस केली. त्यांना हे सर्व लोक उपाशी असल्याचे समजले,तेव्हा गलांडे यांनी श्रीगोंदा येथील त्यांचे मित्र(राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस)अक्षय अनभुले यांना दूरध्वनीवरून नमूद समस्या सांगितली.
अक्षय अनभुले यांनी तात्काळ परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, पुण्यातील गोरगरिबांना अन्न पाणी देणाऱ्या सामाजिक संस्थांशी व(पार्थ पवार फौंडेशनशनचे)करण कोकणे यांच्याशी संपर्क साधत,या सर्व भुकेलेल्या गरीब लोकांची लॉकडाऊन असेपर्यंत जेवणाची सोय केली.
ही मदत मिळेपर्यंत प्रेमकुमार गलांडे व मित्रपरिवार यांनी स्वतः जेवण वाटण्यास सुरुवात केली.या कामात सपना वांगीकर,अभिजित कांबळे,अजित चंगेडिया,अश्विनी गोरे,विनोद गोरे या सर्वांनी सदर लोक उपाशी राहू नये म्हणून प्रयत्न केले आहेत.या उपक्रमाबद्दल गलांडे, अनभुले व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पुण्यातील या परिसरासह श्रीगोंदयातील संबंधीतांकडून कौतुक केले जात आहे.
या आपत्तीमध्ये कोणत्याही वंचितांस अन्नपाण्याची गरज असल्यास आमच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन अक्षय अनभुले व प्रेम गलांडे यांनी माध्यमांद्वारे केले आहे.
