दिनांक २ नोव्हेंबर २०२५,श्रीगोंदा:
सिसपे इन्फिनिटी बिकन (Sispay Infinity Beacon) कंपनीच्या कथित घोटाळ्यातील अटक आरोपी विक्रम बबन गाडीलकर आणि कैलास सुदाम वाळुंज यांच्या जामीन अर्जावर दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी न्यायालयात सुनावणी झाली.

श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१६(२), ३१६(५), ३१८(२), ३१८(४), ३(५) सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण) अधिनियम १९९९ चे कलम ३ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान, दाखल गुन्ह्यातील फिर्यादी तथा साक्षीदार सुशील भानुदास घोडके यांच्या वतीने ॲड. शुभम रमेशराव साके आणि ॲड. प्रेरणा आप्पासाहेब धेंडे यांनी गुंतवणूकदारांची बाजू जोरदारपणे मांडली. त्यांनी न्यायालयाचे लक्ष प्रामुख्याने गुन्ह्याची व्याप्ती आणि गुंतवणूकदारांची झालेल्या मोठ्या फसवणुकीकडे वेधले.

गुन्ह्याच्या तपासामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक आरोपी विक्रम गाडीलकर याच्याकडे या घोटाळ्यातील एक मोठी रक्कम (नऊ कोटी सतरा लाख एकोणचाळीस हजार आठशे बारा रुपये) असल्याचे उघड झाले आहे.

गुंतवणूकदारांच्या आर्थिक शोषणाकडे वकिलांनी तपास यंत्रणेचे लक्ष वेधले. सर्व आरोपींनी संगनमताने गुंतवणूकदारांना फसवून ही रक्कम हवाला पद्धतीने परदेशात पाठवण्याची शक्यताही न्यायालयासमोर मांडण्यात आली.

आरोपी विक्रम गाडीलकरचा भाऊ विनोद बबन गाडीलकर हा इन्फिनिटी बिकन सिस्पे कंपनीचा सुपे परिसरातील एक मोठा एजंट आहे. गुन्ह्यातून बचाव करण्याच्या हेतूने विनोद गाडीलकर आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर एजंट लोकांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश,
अहमदनगर यांच्याकडे खाजगी फिर्याद दाखल करून Sispay – Infinity Company च्या संचालकांविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवण्याचा आदेश मिळवला होता. मात्र, गुन्ह्याच्या तपासात गाडीलकर कुटुंबच आरोपीच्या भूमिकेत आले.

गुंतवणूकदारांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी योग्य त्या वरच्या स्तरावरील तपास यंत्रणेची नेमणूक करण्याची इच्छाही न्यायालयासमोर व्यक्त केली आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
