श्रीगोंदा विधानसभा निवडणूक २०२४: मतदान व मतमोजणीसाठी व्यापक तयारी..

दिनांक १८ नोव्हेंबर २०२४,श्रीगोंदा:

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २२६, श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात मतदान दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत होणार आहे. मतमोजणी दि. २३ नोव्हेंबर रोजी शासकीय धान्य गोदाम, पेडगाव रोड, श्रीगोंदा येथे सकाळी ८.०० वाजता सुरू होईल.

श्रीगोंदा मतदारसंघात १,७६,३६५ पुरुष, १,६३,१५९ महिला, आणि २ इतर मतदारांसह एकूण ३,३९,५२६ मतदार नोंदणीकृत आहेत. त्यांच्यासाठी ३४५ मतदान केंद्रे उभारण्यात आली असून, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी २,०७० कर्मचारी नियुक्त केले गेले आहेत.

सुमारे ५०% मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. यानुसार ३४५ केंद्रांपैकी १७३ केंद्रांवर वेबकास्टिंग होईल. कर्मचाऱ्यांसाठी ४१ एसटी बसेस, १३ मिनीबस आणि १५ क्रूझरसह वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

८५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. १४ ते १६ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या या प्रक्रियेत २९५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या दिवशी निवडणूक ड्युटीवर असलेल्या २,९२० कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाची सुविधा देण्यात आली आहे.

प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग आणि वृद्ध मतदारांसाठी रॅम्प, पिण्याचे पाणी, प्राथमिक उपचार संच, आणि आरामासाठी बसण्याची व्यवस्था केली गेली आहे. प्रचार संपण्याच्या ४८ तास आधीपासून आचारसंहितेचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी दक्षता पथके कार्यरत आहेत.

प्रशासनाने सर्व मतदारांना आवाहन केले आहे की, मतदानाच्या दिवशी आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवावा.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply