दिनांक ६ सप्टेंबर २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील नगरपालिकेमार्फत गटार ब्लॉकेज दुरुस्त करण्यासाठी आलेल्या एका आदिवासी समाजातील इसमासोबत अत्याचाराची घटना घडली आहे. येथील एका इसमाने त्या व्यक्तीला जातीवाचक आणि अश्लील भाषा वापरत शिवीगाळ केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित युवकाने या घटनेची तक्रार श्रीगोंदा पोलीस स्टेशनला केली, मात्र अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
पीडित इसमाच्या म्हणण्यानुसार, काही नगरसेवकांनी ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल होऊ नये यासाठी प्रयत्न केले आणि स्थानिक प्रशासनावर दबाव टाकला. या तक्रारीनंतर पीडित युवकाला पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्याने मारहाण केली व त्याला तिथून हाकलून लावल्यामुळे इसमासह इतर आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे.
काही वेळाने नमूद नगरसेवकांच्या हस्तक्षेपामुळे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या इसमाने आदिवासी इसमाची माफी मागून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु, पीडित युवकाने या प्रकाराबाबत तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “पोलीस अधिकाऱ्याने मला विनाकारण मारहाण करत कायदा हातात घेतला. या घटनेबाबत योग्य न्याय मिळाला नाही तर संघटनेच्या वतीने आंदोलनाची तयारी करनार आहे.”
स्त्रोत:(अधिकृत माहितीनुसार)







