दिनांक ५ सप्टेंबर २०२४, श्रीगोंदा:
अनंत ब्रह्मांड नायक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय आणि निम-शासकीय कार्यालयांमध्ये उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
श्री चक्रधर स्वामी यांनी १२व्या शतकात अवतार धारण करून अनेक जीवांचा उद्धार केला. सत्य, अहिंसा, समता, त्याग, आणि शांती यांसारख्या मूल्यांचा प्रसार करून त्यांनी समाजातील विविध सामाजिक कार्ये केली. १२व्या शतकातील समाजात स्पृश्य-अस्पृश्य, वर्णभेद, जातिभेद, स्त्री-पुरुष विषमता, कर्मकांड आणि अंधश्रद्धा यांचे प्रमाण वाढले होते. समाजातील या विघातक प्रवृत्तींवर मात करण्यासाठी श्री चक्रधर स्वामींनी सत्य धर्माची स्थापना केली. त्यांनी समाजाला समानतेचा हक्क दिला, अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचे आणि व्यसनमुक्त जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले.
श्री चक्रधर स्वामी यांनी केवळ माणसांवरच नव्हे तर पशू, पक्षी, आणि प्राणीमात्रांवर देखील दया दाखवली. त्यांनी मांसाहाराचा त्याग करण्याचा आणि प्रिय भाषण करण्याचा उपदेश समाजाला दिला. त्यांच्या शिकवणींनी संपूर्ण समाजावर सकारात्मक परिणाम घडवला. त्यामुळे त्यांचा अवतार दिन राज्यव्यापी स्वरूपात साजरा व्हावा, अशी मागणी महाराष्ट्रातील महानुभाव अनुयायांनी केली आहे.
याच अनुषंगाने श्रीगोंदा तहसील कार्यालयात माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी श्रीगोंदा तालुका महानुभाव परिषदचे अध्यक्ष प. पू. श्री अविनाश बाबा धाराशिवकर (घोगरगाव), उपाध्यक्ष पू. श्री बाळकृष्ण दादा मनेकर, श्री दिलीप शेट दांडणायक, पू. श्री अशोकराज बाबा अमृते, पू. मीराताई मानेकर, पू. श्री सुबोधमुनी बाबा आराध्य, डॉ. अभिजित तीवाटणे, मा. किशोर उगले, श्री बंडू ढवळे, श्री अविनाश औटी, कोंडीराम दंडणाईक, डॉ. अरुण ढवळे, संजय दंडणाईक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव सर्व शासकीय कार्यालयात साजरा करण्यात यावा, अशी विनंती केली.
स्रोत:(निवेदन)







