श्रीगोंदा: तालुक्यातील पीडित आदिवासी व मागासवर्गीय कुटुंबांच्या तक्रारींकडे श्रीगोंदा पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष.?..

दिनांक ५ सप्टेंबर २०२४, श्रीगोंदा: 

श्रीगोंदा तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागासवर्गीय आणि आदिवासी समाजाच्या तक्रारींची दखल घेण्यात होत असलेल्या उदासीनतेमुळे स्थानिक sc/st बांधवांमध्ये असंतोष पसरला आहे. काही दिवसांपूर्वी बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पिंपळगाव पिसा येथे बाजारातील चप्पल विक्रेत्या मागासवर्गीय कुटुंबाला झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात झालेल्या विलंबामुळे प्रशासनाची कार्यक्षमता आणि तक्रारींच्या निवारणाची प्रक्रिया प्रश्नचिन्हाखाली येत आहे.

बेलवंडी पोलीस ठाण्यासह श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतहि मागासवर्गीय घटकांच्या तक्रारींना वेळेवर न्याय मिळत नसल्याची माहिती समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार, तत्कालीन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या कार्यकाळात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (ॲट्रॉसिटी) दाखल होणाऱ्या तक्रारींवर त्वरीत कार्यवाही होत होती. मात्र, सध्या कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या कारकिर्दीत, मागासवर्गीयच्या तक्रारींवर योग्य कार्यवाही करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे आरोप आहेत.

विशेषत: मागील काही दिवसांत चार वेगवेगळ्या ॲट्रॉसिटी प्रकरणांमध्ये, पीडितांना न्याय मिळण्याऐवजी त्यांना पोलीस ठाण्यातून परत पाठवले गेल्याचे अधिकृतरीत्या समोर आले आहे. ॲट्रॉसिटी कायद्यानुसार तक्रारींवर तत्काळ गुन्हा दाखल होण्याची अपेक्षा असते. परंतु, बेलवंडी पोलीस ठाण्यात पिंपळगाव पिसा प्रकरण आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील चार विविध प्रकरणांमध्ये फिर्यादींना उडवाउडवीची उत्तरे देऊन मागे पाठवले असल्याचे नागरिकांनी सांगितले. मागासवर्गीय व आदिवासी बांधवांच्या तक्रारींवर योग्य कार्यवाही न केल्यास प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्रोत:(अधिकृत महितीनुसार)

जाहिरात..

Leave a Reply