दिनांक ५ सप्टेंबर २०२४,श्रीगोंदा:
महाराष्ट्र राज्यात सध्या ढासळलेल्या सामाजिक सलोख्याला पुनर्स्थापित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “घोंगडी बैठक” उपक्रम हा महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. या उपक्रमास श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, उपक्रमाचा पहिला टप्पा अत्यंत उत्साहात पार पडला आहे.
दिनांक २९ ऑगस्ट २०२४ ते ०२ सप्टेंबर २०२४ या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघातही प्रचंड प्रतिसाद मिळाला. ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. राज राजापूरकर यांच्या नेतृत्वात १८ प्रवक्ते सहभागी झाले होते, ज्यामध्ये पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते प्रा. श्री. व्यंकटेश चामनर सर यांची नियुक्ती करण्यात आली होती.
प्रा. श्री. व्यंकटेश चामनर यांनी या काळात ग्रामीण आणि शहरी भागात एकूण ४१ घोंगडी बैठका घेतल्या, ज्यामधून पक्षाचे ध्येय, धोरणे आणि राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार साहेबांचे महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान तसेच ओबीसींसाठी केलेल्या कामांबाबत सखोल माहिती दिली. बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्याबाई होळकर, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व लोकांसमोर ठेवले गेले.
घोंगडी बैठकीच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांना पक्षाच्या ध्येय-धोरणांची माहिती देण्याचा उद्देश होता. ओबीसी प्रवर्गातील दुर्लक्षित घटकांना आणि विविध जातींना पक्षाच्या संघटनेशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. या उपक्रमासाठी पक्षाचे जिल्हा समन्वयक श्री. विलासराव राहिंज, कार्यकर्ते श्री. दिनेश खेडकर तसेच इतर शेकडो कार्यकर्ते आणि हितचिंतकांचे अमूल्य योगदान मिळाले आहे.
पहिल्या टप्प्यातील यशस्वी आयोजनानंतर, घोंगडी बैठकीचा दुसरा टप्पा ११ सप्टेंबर २०२४ ते १६ सप्टेंबर २०२४ या दरम्यान ४४ विधानसभा मतदारसंघांमध्ये होणार आहे, ज्यामध्ये अधिक व्यापक जनजागृती होण्याची अपेक्षा आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)







