दिनांक १ जानेवारी, श्रीगोंदा:
कर्जत तालुक्यातील पाटेवाडी येथील एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी मोहन जयसिंग निंबाळकर वय-५५ (रा. तालुका कर्जत) या नराधमास श्रीगोंदा सत्र न्यायालयाने शुक्रवार दिनांक ३१ डिसेंबर २१ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
दिनांक ६ ऑगस्ट २०२१ रोजी पिडित अल्पवयीन मुलगी शेळ्या चारण्यासाठी आली असता, तिला पैशांचे आमिष दाखवून, तिच्या शेळ्या आरोपीने भाड्याने राहत असलेल्या घरासमोर बांधत, आरोपीने मुलीस घरात हाताला धरून ओढत नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला होता व याबाबत कुणाला काही सांगितले..? तर, तुझ्या आई-वडिलांना जीवे मारून टाकीन. अशी धमकी त्याने मुलीस दिली होती.

पीडितेच्या बहिणीने हा सर्व प्रकार पाहिल्याने, पीडित मुलगी व तिच्या बहिणीने हा सर्व प्रकार आईला सांगितला. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात येऊन पीडितांनी माहिती सांगितली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तक्रार गांभीर्याने घेऊन, महिला पोलीस अंमलदार जयश्री गायकवाड यांना खात्री करून, पुराव्याच्या अनुषंगाने सविस्तर माहिती पीडित मुलीकडून घेण्यास सांगितले. आणि पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर, ईश्वर माने, संतोष फुंदे यांच्यासह एक तासाच्या आत तात्काळ आरोपीस अटक केले.
आरोपीनेही गुन्हा कबूल केला. त्यानंतर तक्रारी वरून कर्जत पोलिसांनी विविध कलमान्वये ‘स्पेशल केस’ म्हणुन आरोपीवर भादवी कलम ३७६ (२) (आय) (जे) (एन) ५०६, पोस्को ३, ४ प्रमाणे अ.जा व अ.जमाती अत्याचार प्रतिसुधारणा अधिनियम सन २०१५ चे कलम-३(१),(डब्लू) (एल) (२), ३(२) (व्ही), ३(२) (व्ही ए) गुन्हा दाखल केला.
पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सविस्तर आणि सखोल तपास पोलिस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी केला. त्यांना संतोष साबळे, संतोष धांडे, हृदय घोडके, भरत गडकर यांनी मदत केली.

दोन महिन्यांच्या कालावधीच्या आतच श्रीगोंदा सत्र न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यावर काल दिनांक ३१ डिसेंबर २१ रोजी श्रीगोंदा सेशन कोर्टाने निकाल दिला. श्रीगोंदा येथील सेशन न्यायालयाने भादवी कलम ३७६ प्रमाणे जन्मठेप व ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी, भादवी ५०६ प्रमाणे १ वर्ष सक्तमजुरी, बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कलम ४ अन्वये जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी शिक्षा, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ३(१)(डब्ल्यू) दोन वर्ष शिक्षा दोन हजार रुपये दंड दोन महिने शिक्षा कलम ३(२)(व्ही) प्रमाणे जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली आहे. Sub-divisional police officer Annasaheb Jadhav’s thorough investigation .. Accused sentenced to life imprisonment in 5 months ..
यावेळी कोर्ट पैरवी म्हणुन, पोलीस कॉन्स्टेबल नाना दरेकर, आशा खामकर यांनी काम पाहिले. तर सहाय्यक सरकारी अभियोक्ता जे. के. मुसळे, ए. डी. ढगे, व्ही. के. बोर्डे यांनी उत्कृष्टरित्या काम पाहिले. या गुन्ह्याचा सखोल तपास तपासी अमलदार म्हणुन, पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी काम पाहिले.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
