महसूल मंत्रालयाच्या वतीने रक्कम परत करण्याच्या सूचना दिलेल्या वाळू ठेकेदारांपैकी श्रीगोंदा येथीलही एक जण…
दिनांक १९ फेब्रुवारी,मुंबई:
राज्यशासनाच्या तिजोरीत भर घालण्याची महत्त्वाची भूमिका बजावणारा महसूल विभाग सध्या राज्यातील वाळू ठेकेदारांवर चांगलाच मेहरबान झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन महिन्यांत महसूलमंत्री, राज्यमंत्र्यांनी अपिलात आलेल्या औरंगाबाद, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील वाळू ठेकेदारांचे सुमारे 12 कोटी रुपये परत करण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकार्यांना दिल्या आहेत.
संपूर्ण राज्यात सध्या वाळूचा तुटवडा जाणवत आहे. तर पुणे विभागीतील सर्व वाळू लिलावावर हरकत घेतल्याने हा वाद सध्या हरित लवादाकडे प्रलंबित आहे. कर्नाटक सीमेलगत होत असलेल्या वाळू उत्खननाबाबत याचिका दाखल असल्याने हरित लवादाने राज्यातच वाळू उत्खननाबाबत स्थगिती दिली आहे.
मात्र, राज्यात अनेक ठिकाणी राजरोसपणे वाळू तस्करी सुरू आहे. शासनाच्या दप्तरी वाळू लिलावास स्थगिती असली तरी वाळू वाहतूक चोरट्या मार्गाने सुरूच आहे. त्यामुळे शासनाच्या महसुलात मोलाची भर टाकणारे राज्यातील वाळू लिलाव बंद असल्याने राज्य शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. दुसरीकडे राजरोसपणे वाळू उत्खनन अवैधरित्या सुरू आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख शहरातील बांधकामे सध्या सुरू आहेत.
वाळू लिलाव झालेल्या अनेक ठिकाणी संबंधित ठेकेदारांनी वेळेत वाळू उपसा केला नाही, नैसर्गिक आपत्तीमुळे वेळेत वाळू उपसा होऊ शकला नाही, तर अनेक ठिकाणी न्यायालयाने स्थगिती दिल्याने वाळू लिलाव बंद झाले. अशा ठिकाणी विविध जिल्ह्यातील ठेकेदारांनी कोट्यवधी रुपये या वाळू लिलावासाठी गुंतविले होते. काही ठिकाणी वाळू उपसाही केला आहे.
मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे मुदतीपर्यंत वाळू उपसा करता आला नाही, अशा लोकांनी अनामत भरलेली रक्कम परत देण्याची मागणी संबंधित जिल्हाधिकार्यांकडे केली होती. मात्र, त्यावर वेळेत निर्णय न झाल्याने काही वाळू ठेकेदारांनी महसूल राज्यमंत्री व संबंधित खात्याच्या मंत्र्याकडे अपील केले होते.
राज्यातील अशा सुमारे सात ते आठ वाळू ठेकेदारांना तब्बल 12 कोटी रुपयांची रक्कम परत करण्याचे आदेश महसूल मंत्रालयाच्या वतीने संबंधित जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यशासन वाळू ठेकेदारांवर एवढे का मेहरबान झाले आहे, याविषयी सध्या उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
महसूल मंत्रालयाच्या वतीने रक्कम परत करण्याच्या सूचना दिलेल्या वाळू ठेकेदारांपैकी सर्वाधिक ठेकेदार हे सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. यामध्ये मयुरेश्वर डेव्हलपर्स, ता. हवेली, पुणे (34 लाख 67 हजार), चांभुज, ता. पारनेर, अहमदनगर (23 लाख 25 हजार), श्रीगोंदा स्वामी समर्थ एंटरप्रायझेस, अहमदनगर (36 लाख 61 हजार), रेठरे हरणाक्ष, ता. वाळवा, सांगली (15 लाख 80 हजार).तर देवीकवठा,ता.अक्कलकोट येथील मे. दत्त एंटरप्रायझेस (5 कोटी 49 लाख) तसेच अभिनंदन गांधी (4 कोटी 75 लाख) रुपये, तर औरंगाबाद येथील वांजरगाव वैजापूर येथील (76 लाख रुपये) परत करण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकार्यांना दिल्या आहेत.